Bookstruck

आधार मिळाला 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तूं का काढलींस ही चित्रें ? अरे वा. एवढासा आहेस, पण चित्रें छान काढतोस. माझ्याकडे येत जा. मी तुला चित्रांचे संग्रह दाखवीन. येशील ना ? ये. कितीतरी मुलें येतात.''

''पण माझी तुमची ओळख नाहीं.''
''आलास म्हणजे होईल. आई कामाला गेली वाटतें ?''
''हो''
''तुझें जेवण ?''
''आईनें भाकरी भाजून ठेवली आहे. ती खाऊन जाईन.''

''मी भाजी देऊं आणून? चल आमच्याकडे. भाजी घेऊन ये. ओळखहि होईल. तुझें नांव रंगा ना ?''

''तुम्हांला काय माहीत ?''
''तुझी आई तुला हांका मारते, त्या कानीं पडतात. तू आईला मदत करतोस. चांगला आहेस तूं मुलगा. चल आमच्याकडे.''

दार ओढून घेऊन रंगाला घेऊन वासुकाका आपल्या जागेंत आले.
''ये रंगा. किती दिवस तुला बोलविन बोलविन म्हणत होतें'' सुनंदा म्हणाली.
''अग त्याला भाजी दे वाटींत. त्याच्या आईनें भाकरी भाजून ठेवली आहे.''
''जेवायलाय राहूं दे नाहींतर ?''
''भाकरी फुकट जाईल.''
''पुन्हां कधीं ये. ही घे भाजी.''

रंगा भाजी घेऊन गेला. त्याची शाळेंत जाण्याची वेळ होत आली. जेवून तो शाळेंत गेला. आज त्याला आनंद झाला होता. तो पोटांत मावत नव्हता.

''रंगा, आज किती हंसतो आहेस? आईनें गोड गोड जेवण दिलें वाटतें ?'' पंढरीनें विचारलें.

''आमच्या वाड्यांत वासुकाका आहेत. ते छान आहेत नाहीं ? ते मला चित्रांचा संग्रह दाखविणार आहेत.''

« PreviousChapter ListNext »