Bookstruck

आधार मिळाला 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुनंदा काशीला घेऊन आली. रंगा तेथेंच वासुकाकांच्या खाटेवर झोंपीं गेला होता. त्याच्याजवळ बसून ते वाचित होते. मधून त्याच्या मुखाकडे वात्सल्यानें बघत. तो त्यांचा जणूं मुलगा झाला होता. त्यांचे अपत्यप्रेम आजवर कोंडलेलें त्याच्याठायीं जडलें, प्रगट झालें.

सुनंदा, काशी, वासुकाका तिघें बराच वेळ बोलत होतीं.
''काशीताई, घाबरुं नका, उद्यांपासून त्याच्याकडे जाऊं नका.''
''महिन्याचा पगार ?''

''जाऊं दे पगार. तुम्ही काळजी करुं नका. मी देईन पैसे. पैशासाठीं तुम्ही परत याल अशी त्या चांडाळाची कल्पना असेल. पुन्हां त्याचें तोंड पाहूं नका. तो पोलिसांत जाणार नाहीं. त्याची छाती नाहीं. निर्धास्त असा बरं का. नका रडूं. तुमचा मुलगा मोठा कलावान् होईल. नांव मिळवील.''

''उद्यांपासून आतां काम कोठें बघूं ?''

''काशीताई, तुम्ही सेवासदनांत काम कराल का ? तेथें कांही मुली श्रीमंत असतात. त्यांचे काम असतें. इतरहि काम मिळेल. फावल्या वेळीं प्रौढ स्त्रियांच्या वर्गात शिकालहि. तुमची तेथें राहायाची व्यवस्था झाली तर रंगा आमच्याकडे राहील. रविवारीं यावें भेटावें. मधूनहि येतां येईल. बघा विचार करुन. म्हणजे असले प्रसंग येणार नाहींत. खरें ना ?''

''तुमचा आधार मिळाला, जगदंबेची कृपा.''
''आपण कोण कोणाला कितीसे पुरणार ? खरी कृपा देवाची, जगदंबेचीच.''
''नंदा येथेंच निजला.''

''निजूं दे. आतां उठवूं नका त्याला. मला तो परका नाहीं. आम्हांला मूल ना बाळ. रंगाच आमचा मुलगा.''

''मी मेलें बिलें तर तुम्ही त्याला वाढवा.''

''असें वेडेवांकडें मनांत नका आणूं. मुलाचें वैभव बघाल. चांगले दिवस येतील. आशेनें रहा.''
''जातें मी.''
''विचार करा नि मला सांगा.''
''मी कसला विचार करुं ? तुम्ही सांगाल तें हिताचेंच असेल.''
''मी त्या संस्थेंत उद्या विचारतों. तेथें भलीं माणसें आहेत.''

« PreviousChapter ListNext »