Bookstruck

आधार मिळाला 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

काशीताई आपल्या खोंलींत गेली. किती तरी वेळ तिला झोंप येईना. भावानें घालवलें. परंतु ज्यांची ओळख ना देख ते भाऊ बनले. देवाची दया. विचार करतां करतां तिचा डोळा लागला.

दुसर्‍या दिवशीं वासुकाका सेवासदनांत गेले. ते तेथें मागें अवैतनिक शिकवित असत. त्यांची प्रकृति बिघडल्यामुळें ते जातनासे झाले होते.

''या वासुकाका, बरेच दिवसांनी आलांत'' व्यवस्थापक बाईंनी विचारलें.
''कामाला आलों आहें.''
''तुमचें काम सर्वांच्या आधी. सांगा.''
वासुकाकांनी सारी हकीगत सांगितली.

''काशीबाईंची करुं सोय. दोनचार मुलींची धुणीं मिळतील. स्वयंपाकघरांतहि भाज्या चिरणें, निवडणें, काम देऊं. हरकत नाहीं. अशा भगिनींची नाहीं सोय लावायची तर कोणाची लावायची ?''

वासुकाका आनंदानें घरीं आले. त्यांनी काशीताईस सारें सांगितलें.

एकेदिवशी काशीताई सेवासदनांत रहायला गेल्या. त्यांचें सामान वासुकाकांच्या घरीं ठेवण्यांत आले. रंगा त्यांच्याकडे राहिला.

काशीताईंना प्रथम जरा जड गेलें. कोणाची ओळख नाहीं. परंतु पुढें त्यांना समाधान वाटूं लागलें. त्या सारें नीटनेटकें करित. पालेभाजी धुवून चिरीत. लिंबाच्या फोडी कापायच्या झाल्या तर सारख्या कापीत. रस जमीनीवर पडूं नये म्हणून खालीं वाटी ठेवीत. तो रस चटणींत वगैरे ओतीत. मुलींचे कपडे स्वच्छ धुवीत, घड्या करुन ठेवीत. मधल्या वेळेस बारा ते दोन त्या शिकत. मग मधल्या सुटींतील मुलींची खाणीं. तीं झाल्यावर डाळ तांदुळ निवडणें, संध्याकाळची भाजी चिरणें, सुरु होई काम.

''नयना, कां ग निजलीस ? काय होतें ?''
''काशीताई, सारें आंग दुखत आहे. ताप का येईल ? डोकें जड झालें आहे.''
''मी चेपूं का आंग ? वत्सलेकडून अमृतांजन आणूं का कपाळाला चोळायला ?''
''तुम्हांला त्रास. तुमच्या वर्गाची वेळ होईल.''

« PreviousChapter ListNext »