Bookstruck

आधार मिळाला 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

काशी गेली. तिनें आमृतांजन आणलें. चोळलें. नयनाचें आंग चेपीत ती बसली. इतक्यांत व्यवस्थापक बाई तेथें आल्या. काशीताई उठून उभी राहिली.

''बसाहो. चेपा तिचं आंग. नयना, काय ग झालें ? घरची आठवण आली असेल. होय ना ? बाबांची लाडकी आहेस. ताप नाहीं अंगांत. उद्या जुलाब घें. बरें वाटेल. काल भजीं अधिक खाल्लीं असशील. आणि काशीताईंनी तुला आग्रह केला असेल. बरी हो संध्याकाळी खेळायला.'' बाई गेल्या. काशीताई नयनाजवळ बसून होती.

''काशीताई, मला आई नाहीं. घरीं बाबा आहेत. त्यांचं माझ्यावर फार प्रेम.''
''ते येणार ना आहेत भेटायला ?''
''तुम्हांला कोणी सांगितलें?''
''प्रमिला नि कमल म्हणत होत्या.''
''हो येणार आहेत. तुम्ही बघाल बाबांना. शान्त नि प्रेमळ आहेत. माझे बाबा.''

दोघी बोलत होत्या. नयनाला आतां बरें वाटत होतें. मधल्या वेळेला काशीताईंनी तिला कोको करुन दिला.

एके दिवशीं काशीताई नयनाच्या खोलींत बसल्या होत्या. त्यांच्या हातांत एक चित्र होतें. इतक्यांत नयना आली.
''कोणाचें हें चित्र ? कोणी काढलें ?'' तिनें विचारलें.
''रंगानें.''
''तुमचा तो रंगा?''
''हो.''
''किती छान आहे, खरेंच किती छान ! मला नाहीं असें येणार. मला चित्रकलेचा नाद आहे. मी बाबांना म्हणत असतें मी मोठी चित्रकार होईन. जागांतील चित्रशाळा बघून येईन. खरेंच किती सुंदर हे रंग ! एक रंग कोठें संपला, दुसरा कोठें सुरु झाला, तें समजून नाहीं येत. आकाशांतील रंग असेच मिसळलेले असतात.''

''रंगा लहानपणीं आकाश बघत बसे. एकदां मी त्याला चल घरीं म्हणून मारलें.''
''रंगाचीं आणखी चित्रें आणाल ? तो कोणते ब्रश वापरतो !''
''मला काय माहीत ? रविवारीं माझ्याबरोबर याल ?''
''हो. बाईंना विचारुन जाऊं आपण. रंगाचीं चित्रें बघेन.''

« PreviousChapter ListNext »