Bookstruck

मित्राचें पत्र 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रंगा, तूं मला प्रेम दिलेंस. तूं पुरणानें भरलेली पुरणपोळी नाहीं दिलीस, तर माधुर्यानें भरलेलें स्वत:चें हृदय दिलेंस. रंगा, रडूं नको. आनंदी रहा. अश्रु पूस. विश्वभारतींत जा. मीहि तुला ५/१० रुपये दरमहा पाठवीत जाईन. अधिक काय लिहूंरे माझ्या हृदया, माझ्या प्रेममूर्ते ? पुरे आतां. मला जायचें आहे रंगा.
तुझा पंढरी.

रंगानें तें पत्र कितीदां तरी वाचलें. त्यानें सुनंदा आईलाहि तें वाचून दाखविलें.

''लष्करी कारकून परंतु कविहृदयी आहे.''

''होय आई. त्याच्या चुलत्यांच्या आग्रहामुळें त्याला लष्करांत जावें लागलें.''

''पुन्हां खरेंच का रे युध्द सुरु होणार ?''

''निरनिराळ्या ठिकाणी छोटीं युध्दें सुरुच आहेत. यांतूनच जगभर वणवा पेटेल. पुन्हां कोटयवधि माणसें मरतील. मागच्या महायुध्दंतून रशियन क्रान्ति वर आली. या युध्दंतून काय निष्पन्न होईल ? चीन, हिंदुस्थान हे तर प्रचंड देश. हे का गुलामच राहतील ? आई काय होईल सांगतां येत नाहीं''

''तूं विश्वभारतींत कधीं जायचें ठरवतोस ?''

''तुला सोडून जावें असें वाटत नाहीं''

''ध्येयासाठी, कर्तव्यासाठीं जायचें. जा. तुझा मित्रहि मदत पाठवणार आहे. मीहि कामधाम करीन. घर गहाण ठेवूं. तुझ्याजवळची कला वृध्दिंगत करुन ये. आतां वेळ नको दवडूं हो रंगा'' ती थोर माउली म्हणाली.

« PreviousChapter ListNext »