Bookstruck

सुनंदाची तपश्चर्या 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुनंदानें रंगाला विश्वभारतींत पाठविलें. आणि त्याला मदत करतां यावी, त्याला पैसे कमी पडूं नयेत म्हणून ती नानाप्रकारचे उद्योग करी. ती एकदांच जेवे. स्वत:चा खर्च तिनें कमी केला. घर गहाण ठेवलें होतें. अर्थात् अजून मालकी तिचीच होती. घरांत एक भाडेकरुन तिनें ठेवला. लहानशा खोलींत ती राही. रंगाला ददात नसो हें तिचें स्वप्न, हा तिचा ध्यास. रंगामध्यें ती पतीचें ध्येय बघे. रंगा जणूं त्यांचे ध्येयबाळ.

तिनें एक शिवणकामाचें हातयंत्र घेतलें. ती शिवणकाम शिकलेली होती. ती काम करी. तिनें दारावर पाटी लावली. 'येथें बायकांचे, लहान मुलांचे कपडे शिवून मिळतील' अशी ती पाटी होती. आणि मुलींचे झंपर, पोलकीं, परकर ती शिवी. मोठ्या बायकाहि आपल्या अंगचीं पोलकीं वगैरे शिवून नेत. सुनंदा छान शिवी. तिला कलात्मक दृष्टि होती. कधीं मुली आल्या म्हणजे त्यांच्याजवळ ती बोलत बसे. त्यांना देशाच्या गोष्टी सांगे. कोणी कोणी मुली विलायती कापड घेऊन यायच्या. सुनंदा म्हणायची ''खादी नाहीं तर नाहीं. निदान देशी तरी कापड घ्यावें. स्वदेशी हा धर्म आहे. त्यांत परकीयांचा व्देष नाहीं. आपण जवळच्या माणसास मदत देऊं शकतों. स्वदेशी म्हणजे शेजारधर्म.''

कधीं ती मुलींना विवेकानंदाच्या गोष्टी सांगे, तर कधीं सीतासावित्रींच्या चरित्रांतील उदात्तता सांगे. सुनंदाची ती लहानशी खोली म्हणजे जणूं आश्रम होता. तेथें कर्मयोग होता, ध्येयवाद होता.

सुनंदा रिकामी नसे. कांहींना कांहीं उद्योग चालूच असे. दर आठवड्यास ती रंगाला पत्र पाठवी. त्याला उत्साह देई, प्रेरणा देई.

परंतु सुनंदाला तो अपार श्रम सोसला नाहीं. भरपूर काम आणि आराम मात्र नाहीं. खाणेंहि एकवेळ. पतिनिधनानंतर ती जणुं संन्यासिनी बनली होती. दूध पीत नसे, तूप घेत नसे. कधीं भाकरी आणि पाणी एवढयावरच राही. ती अशक्त दिसूं लागली. फिक्कट दिसूं लागली. तरी तिचा उद्योग चालूच असे.

एकेदिवशीं तिला काम करतां येईना.
''झालीं का झबलीं शिवून ?'' एका मुलीनें येऊन विचारलें.
''नाहीं झाली. उद्यां देईन''
''कितीदां खेपा घालायच्या ? तेवढाच का आम्हांला उद्योग''

''बरं बसा हो जरा. आतां देतें पुरी करुन'' असें म्हणून सुनंदा उठली. परंतु तिच्या डोळ्यांसमोर अंधेरी येऊन ती पडली. ती मुलगी घाबरली. तिनें बिर्‍हाडांतील लोकांना हांका मारल्या.

« PreviousChapter ListNext »