Bookstruck

सुनंदाची तपश्चर्या 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुनंदा शुध्दीवर आली.
''उद्यां दिलीं झबलीं तर नाहीं का चालणार ?'' तिनें करुणेनें विचारलें.

''तुम्हांला बरें नसेल वाटत तर घाई नाहीं.'' ती तरुणी निघून गेली. सुनंदा आंथरुणावर पडली.

एके दिवशीं वासुकाकांचे एक शिक्षक मित्र सुनंदाकडे आले. ते चकित झाले.
''तुम्हांला काय होतें ?''
''कांही नाहीं. जरा थकवा वाटतो''
''रंगाला कळवलेंत का ?''

''त्याला नका कळवूं. त्याला शिकूं दे, मोठा होऊं दे. रंगा भारताचें नांव दिगंत नेईल असें ते म्हणत. रंगाला उत्साह देणें हें माझें कार्य''

''तुम्ही प्रकृतीला जपा'' ते शिक्षक म्हणाले. ते निघून गेले. परंतु त्यांनी रंगाला लिहिलेंच. रंगा तिकडे चित्रकलेच्या उपासनेंत रंगला होता. भारताचीं ध्येयें समजून घेत होता. एकेदिवशीं तो रवींन्द्रनाथांच्या पिताश्रींच्या समाधीजवळ बसला होता. इतक्यांत त्याला एकानें पत्र आणून दिलें. त्यानें तें वाचलें. तें पत्र हातांत होतें. त्यावर त्याच्या डोळ्यांतील पाऊस पडत होता.

''रंगा, काय आहे पत्रांत ? हेमन्तानें विचारलें.
''हेमन्त, माझी आई आजारी आहे''
''आई ? तुझी आई नाहीं ना ?

''जन्म देणारी गेली, परंतु देवानें दुसरी दिली. जिनें मला मायाममता सारें दिलें. तिचे पति वारले. माझ्यासाठीं ती कष्टत असते. मला मदत पाठवते. मला जायला हवें''

दोघे मित्र गेले. रंगा सर्वांचा निरोप घेऊन निघाला. त्याला नंदलालांनी प्रशस्तिपत्र दिलें.

''परंतु पुन्हां येथें ये'' ते त्याला म्हणाले.

« PreviousChapter ListNext »