Bookstruck

ताईची भेट 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''अजून येण्याची अवधि आहे. तो येईल. कलावान् सहृदय असतात. तो येईल. तूं त्याच्यासाठी स्वयंपाक करुन ठेवला आहेस ? तो येथेंच राहूंदे चार दिवस. हें घर त्याचेंच. तो येथें राहील. परलोक ज्याला दिसूं लागला त्याची इच्छा तो मोडणार नाहीं.''

तो डोळे मिटुन पडला. आणि थोड्या वेळानें दारावर कोणी तरी टकटक केलें.
''भाऊ आला'' ती म्हणाली.
लगबगीनें उठून तिनें दार उघडलें. रंगाची धीरगंभीर मूर्ति आंत आली.
''ताई, बरी आहेस ? यांचे कसें आहे ?''
''बघ तूंच''
तो त्यांच्या उशाजवळ बसला. ताप खूप होता. ते डोळे मिटून होते.
''थर्मामीटर आहे का ?''
''नाहीं''
''ताप बराच असावा. मी एक थर्मामीटर आणतों. औषध कोणाचें ? कोण डॉक्टर ?''

त्यानें औषधाची बाटली पाहिली. तिच्यावर सारें होतेंच. तो बाहेर पडला. थोड्यावेळानें थर्मामीटर वगैरे घेऊन आला.

''कोण रंगा ?'' एकदम उठून अमृतरावांनी विचारलें.
''पडून रहा हां. आतां बरे व्हाल.''
''आतां कायमचें बरें व्हायचें. नको इथली यातायात. ती बघा लिली. मला बोलवते आहे. मरतांना भाऊ भाऊ म्हणे. मी तिला मारलें. ते पहा तिचे गाल. मी मारल्यामुळें लाल झाले आहेत. लिले, क्षमा मागायला येतों हां बाळ. तूं पित्याचा हात धर व त्याला देवाजवळ ने. रंगा, तुमची क्षमा मागतों. तुम्ही जेवा जा. यांना वाढ ग. भूक लागली असेल त्यांना.''

''तुम्ही बोलूं नका.''

''बोलूं दे. मनांतील वेदना बाहेर ओतूं दे. आतां सारा खेळ संपणारच आहे. हिला मी छळलें. क्षमा कर म्हणावें. रंगा, तिला तुम्ही आधार द्या. देवाचा सर्वांनाच आहे.''

''तुम्ही बरे व्हा. सुखाचा संसार करा.''
तो उठला नि स्वयंपाक घरांत गेला.

« PreviousChapter ListNext »