Bookstruck

ताईची भेट 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''ताई, लिली कधीं ग गेली ?'' त्यानें स्फुंदत विचारलें. तिनें बिर्‍हाड बदलल्यापासून सारा वृत्तान्त सांगितला.

''रंगा, मी त्यांची सेवाचाकरी करित नाहीं. माझें नाहीं मन एवढें मोठें.''
''ताई, मन मोठें करायला हवें. आपणहि का पाषाण व्हायचें ?''

''नवर्‍यांनींच अहिल्येसारख्या सतींचें पाषाण केले. स्त्रियांचा काय दोष ?''
''परंतु त्या पाषाणांना इतकी जाणीव, इतकी संवेदना नि जागृति की  रामाच्या चरणांचा जरा स्पर्श होतांच त्यांतून त्या पुन्हां अहिल्या होऊन उभ्या राहिल्या. ताई, पुन:पुन्हां मनुष्य पाषाणयुगांत जात असतो. पुन:पुन्हां त्यानें रामराज्यांत जायची धडपड करायची असते; पाषाण युगांतून सुवर्णयुग आणायचें असतें.''

''रंगा, थोडें जेवतोस ना ?''
''लिलीला जवळ घेऊन जेवेन असें मनांत म्हणत आलों.''

''जेव हो दोन घांस. तूं येशील असेंच वाटत होतें. तुझ्या आवडीची भाजी केली आहे.''

''ते तिकडे आजारी असतां मी का आवडीची भाजी खात बसूं ? ताई, तूं कठोर झाली आहेस.''
''तुझ्या बाबतींत नाहीं.''
''परंतु अमृतरावांना रस तरी काढून दिलास ?''

''ज्यानें माझें जीवन नीरस केलें, कुस्कुरलें, त्याला कशाला रस देऊं ?''
तो उठला. त्यानें मोसंब्यांचा रस काढला.

''थोडा रस घेता ना ?'' त्यानें प्रेमानें विचारलें.

''कोण रंगा ? द्या. तुमचे थोर हात क्षमाशील आहेत. देवाकडे जातांना माझें जीवन सुंदर रंगवून पाठवा बरें का ?''

''पश्चात्ताप झाला कीं जीवन सुंदर होतेंच.''

« PreviousChapter ListNext »