Bookstruck

भारत-चित्रकला-धाम 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''कोण आहे ?''
''मी''
''ताई, येथें अंधारांत कशाला आलीस ?''
''प्रकाश मिळवायला. मी नेहमींच अंधारांत आहें. तुझ्याजवळ प्रेमप्रकाशाची मी भीक मागत आहें. नकोरे मला दूर लोटूं.''

तिनें त्याच्या खांद्यावर मान ठेवली. कढत श्वास, कढत अश्रु. परंतु तो स्तब्ध होता.

''ताई, अश्यक्य तें मला सांगूं नकोस.''
''तर मग या नदीच्या डोहांत मला लोट.''
''लोटणारा मी कोण ? कां तू मला दु:ख देतेस ?''
''तूं नाहींना मला दु:ख देत ? रात्रंदिवस माझ्या जीवनांत घुसून कोण मला सतावित आहे ?''

''तूं मनाचें दार बंद कर. तेथून मला घालव.''
''मला ती शक्ति नाहीं. माझ्या मनाला दारें नाहींत. सर्वत्र तूंच भरुन उरला आहेस. नको कठोर होऊं.''

''तीं बघ आरती सुरु झाली. आपण जाऊं.''
तो उठला. ती तेथेंच होती. ती जीव देणार नाहीं त्याला खात्री होती. तो मंदिरांत जाऊन प्रभूच्या मूर्तीसमोर सद्गदित होऊन उभा राहिला. उघड्या डोळ्यांनीं बघतां बघतां शेवटीं डोळे मिटून उभा राहिला. आरती संपली. तीर्थप्रसाद झाला. लोक गेले.

''रंगा, जेवतोस ना ?'' ताईनें विचारलें.
''तूं आरतीला नाहीं आलीस ?''
''मी माझ्या देवाची आरती बाहेर करित होतें. माझा देव तूं, तुझा देव प्रभु रामचंद्र. ज्यानें त्यानें आपल्या देवाची पूजा करावी. जेव मी वाढतें.''

''तूं आतां घरीं जा. आई वाट बघत असेल.''
''मी नाहीं घरीं जात. जेथें तूं तेथें मी. मी येथेंच राहीन.''
''ताई, नको ग त्रास देऊं. हें राममंदीर का विलासमंदीर करायचें आहे ? काय बोलतेस ? घरी जा.''

« PreviousChapter ListNext »