Bookstruck

भारत-चित्रकला-धाम 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ती रडूं लागली. तो उठला. त्यानें आपले कुंचले घेतले. तो चित्र रंगवूं लागला. तें सूरदासाचें चित्र होतें. सूरदासासमोर वेश्या उभी आहे. सूरदासाच्या हातांत काढून घेतलेले स्वत:चे डोळे आहेत. डोळ्यांतून रक्त त्या नेत्रकमलांवर पडत आहे.

''ज्या माझ्या डोळ्यांनी तुला मोह पाडला, रामाची आठवण द्यायच्या ऐवजीं कामाची आठवण दिली, ते डोळे कशाला ठेवूं ?'' असें सूरदास विचारित आहे.

''रंगा हा कोणता प्रसंग ?''  ताईनें विचारलें. सूरदासाचे डोळे पाहून भाळलेल्या त्या वेश्येची कथा त्यानें सांगितली. डोळे काढून सूरदास तिच्याकडे जातो व सांगतो कीं ''माझ्या हातांनी हे भुलवणारे डोळे दूर केले. आतां तूं रामाकडे वळ.'' ताई ऐकत होती. इतक्यांत सुनंदा तेथें आली.

''अग घरीं नाहीं का यायचें ? मी म्हटलें आली नाहींस तर रंगाला बरें नाहीं की काय ?''

''यांना जेवा जेवा म्हणत आहें. परंतु ऐकतील तर''
''कायरे रंगा, जेवायचें नाहीं का ? रात्रंदिवस काम करुन तुलाहि का मरायचें आहे ? काय ही प्रकृति ! कितीदां सांगितलें की घरीं येत जा, झोंपत जा. दिवसभर काम करावें, रात्रीं आराम घ्यावा. ऊठ. जेव. सारें निवून गेलें असेल अन्न. उद्यांपासून तूं घरींच येत जा सायंकाळी. रात्रीचें काम बंद.''

''रामनवमीपर्यंत पुरें व्हायला हवें सारें.''
''होईल पुरें.''
''आई, मी मरणार नाहीं. राम काम पुरें करुन घेईल. चिंता नको. जा तुम्ही दोघी.''

''तूं हट्टी आहेस. तुझी आई म्हणायाची.''
सुनंदा नि ताई गेल्या. रंगानें जेवण केलें. मध्यरात्रींपर्यंत तो रंगवित होता. मग बाहेर पडला. थंडगार वारा वहात होता. सारी सृष्टि त्याला जणूं स्पर्श करिता होती. आकाश किती फुललें होतें. धबधब्याचा मंत्रजागर कानीं येत होता. सृष्टींतील विश्वसंगीत तो ऐकत होता. त्या विराट् मूक संगींतातील तोहि एक तान बनून गेला. तेथेंच नदीतटाकीं एका शिलाखंडावर तो झोंपला.

तो जागा झाला तों त्याच्या चरणाशीं त्याला फुले आढळलीं. जवळच फुलांचा एक हार होता. ताई का येऊन गेली ? तो उठला. तो मंदिरांत गेला. तेथें ताई प्रभूसमोर उभी होती. तोहि शेजारीं उभा राहिला. दोघांनी डोळे उघडले.

« PreviousChapter ListNext »