Bookstruck

पराक्रमाने पुन्हा सोडविल !

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
मुक्त आजला गंगा, यमुना, गोदावरि अन् सरस्वती !
आणि नर्मदा, कावेरी, परि सिंधु कुठे मुक्त भारती?
स्नानासाठी अनुपस्थित का तुझे सलिल हे अंबितमे
कुणी लोटले दूर तुला गे ! तुजविण अपुरे स्नान गमे !
परचक्राचे तुला नियंत्रण ! हाय ! काय हे तुझी स्थिती !
आद्य ऋषींचे वंशज देवी ! तुला कसे गे विस्मरती !
म्लेंच्छ रेटुनी परतीरी जो विजये प्याला तुझ्या जला
पराक्रमाने पुन्हा सोडविल महाराष्ट्र एकला तुला !
तुझ्या तटावर बसलेले
ऋषिवर तप करते झाले
देव तुझ्या तोर्ये धाले
स्थान तुला देवीचे दिधले, तोषविले तू महीतला
पराक्रमाने पुन्हा सोडविल महाराष्ट्र एकला तुला
सिंधूवाचुनि हिंदु ! सरिते ! अर्थावाचुनि शब्द जसा
प्राणावाचुन कुडी जशीं वा रवितेजावाचून रसा
जिथे घडविली सामगायने पहिली, पहिल्या वेदऋचा
संध्यावंदन करुनि भास्करा अर्ध्य दिले ओघात जिच्या
सुंदर सूक्ते रचिली जेथे, यज्ञ मांडती जिथे मुनी
मंत्रोच्चारासवे आहुती करती अर्पण हुताशनी
सिंधु-हिंदुच्या भाग्याचे
संस्कृतिच्या संबंधाचे
नाते का विसरायाचे ?
विसरो कोणी ! ऋणास राहिल सह्याद्री नित्य जागला
पराक्रमाने पुन्हा सोडविल महाराष्ट्र एकला तुला
अशीच पूर्वी अंतरली तू येता म्लेच्छांचा घाला
उत्तर विजयावांचुनि गेले शिवप्रभू निजधामाला
सरसावे सेना विजयाला, चंबळ, यमुना जल प्याली
न्हाली गंगेमधे, शतद्रू आणि वितस्तेवर आली
ओलांडत चौखूर नद्या त्या सेना तव तीरी गेली
अटकेवर लावली ध्वजा अन् भूमि तुझी पावन केली
उन्मादाने थयथयती
भीमथडीचे हय, पीती
सिंधूच्या तीरावरती
बांधतील ते पुन्हा ध्वजानें हिंदु-सिंधुला हिमाचला
पराक्रमाने पुन्हा सोडविल महाराष्ट्र एकला तुला !

« PreviousChapter ListNext »