Bookstruck

न्याय जिवंत झाला 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वाडवडील म्हणत, ‘जो नांगर चालवील तो खरा मालक.’ परंतु आज गादीवर बसणारा मालक ठरला आणि आम्ही श्रमणारे चोर ठरलो, अन्नाला महाग झालो. महाराज, कोठे आहे न्याय? या केशवचंद्राने आम्हाला आज घरातून बाहेर पडू नका म्हणून बजावले. आम्ही तुमच्या कानांवर गोष्टी घालू अशी त्याला भीती वाटली; परंतु मला घंटेची आठवण झाली. न्याय मेला, तुम्हास कळवावे म्हणून आम्ही सारे घंटा वाजवीत बसलो.”

“चला त्या मंडपात. मी सारी चौकशी करतो.” राजा म्हणाला.

सारी मंडळी सभामंडपात आली. एकीकडे श्रीमंत बसले. एकीकडे गरीब बसले. राजाने सारी चौकशी केली. केशवचंद्राचे गुन्हे सिद्ध झाले. तो पैसेखाऊ न्यायधीश, तो वकील, सारे तेथे अपराधी म्हणून उभे राहिले.

“यांना कोणती शिक्षा देऊ? तोफेच्या तोंडी देऊ?” राजाने विचारले.

“त्यांना मारण्याची जरुरी नाही. ते आमच्यात राहोत. आमच्याबरोबर खपोत, श्रमाचे खावोत, त्यांची बुद्धी आमच्या कामी पावो, आमचा हिशोब ठेवोत. महाराज, या गावची जमीन सा-या गावाच्या मालकीची असे करा. सारे मिळून श्रमू. येथे स्वर्ग आणू. येथे नको कोणी उपाशी, नको कोणी चैन चालवणारा.” भीमा म्हणाला.

“तुमचा प्रयोग यशस्वी करा. भरपूर पिकवा. नवीन नवीन उद्योग शिका. तुमचा गाव आदर्श करा. तुम्हाला छळणा-यांवरही तुम्ही सूड घेऊ इच्छित नाही, ही केवढी उदारबुद्धी! मला राजालाही आज तुम्ही खरी दृष्टी दिलीत. सूडबुद्धीन शेजारच्या राजाशी मी युद्ध करायच्या विचारात होतो; परंतु आता दुस-या भल्या मार्गाने जाईन. शाबास तुमची! तुमचे समाधान झाले ना?” राजाने प्रेमाने विचारले.

“होय, महाराज!” लोक आनंदाने उदगारले.

“मग आता काय घोषणा कराल?” राजाने विचारले.

“न्याय मेला होता, परंतु जिवंत झाला, अशी घोषणा करू.” लोक म्हणाले.

राजा निघून गेला. केशवचंद्र व भीमा प्रेमाने एकमेकांस भेटले. तो गाव सुखी झाला, तसे आपण सारे होऊ या.

« PreviousChapter ListNext »