Bookstruck

शहाणा झालेला राजपुत्र 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करीत. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला, ‘याला घालवून द्यावे. टक्कोटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.’ राजाने राणीला हा विचार सांगितला.

“आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर!” ती रडत म्हणाली.

“तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे.” तो म्हणाला.

राणी काय करणार, काय बोलणार? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला, “राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये!”
“तुमची आज्ञा प्रमाण,” असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले.

“हे घे चार लाडू. भूक-तहानेचे लाडू.” ती म्हणाली.

आईचा आशीर्वाद घेऊन, ते लाडू घेऊन, धनुष्यबाण नि तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला, रात्र गेली. चालत होता.थकल्यावर दगडाची उशी करून झाडाखाली झोपे. पुन्हा उठे नि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक झरा खळखळ वाहत होता. हात-पाय धुऊन तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले.

लाडू खाऊन, पाणी पिऊन तो पुढे निघाला, तो त्याला एक हरिणी दिसली. तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वत:ची आई आठवली. माझी आई मला, तशी ही हरिणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले. त्याने बाण परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे, असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधीभोळी, निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली.

« PreviousChapter ListNext »