Bookstruck

समर्पण

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

हे हृदयपुरुष जे अजून नव्हते फुलले

ते तूच फुलविले, तुलाच अर्पण केले

मी जरी फुलविली रानजाइची फुले

पण सुगंध त्यांचा तव हृदयी दरवळे

कशि घडून आली जादू ही, ना कळे

हे तुलाच अर्पण असोत त्यांचे झेले

ही सतार माझी प्रथम तुवा स्पर्शिली

तारेवर फिरली तव कोमल अंगुलि

कशि मंजुळ, कातर उठे तरंगावलि

जे गाणे स्फुरले, तुझ्याच हृदयी घुमले

या रुक्ष भूमिवर बीजे मी विखुरिली

ही भूमि तूच गे स्नेहजळे शिंपिली

अंकूर फुटुनि ही फुलझाडे वाढली

तुजमुळेच देवी उपवन माझे फुलले

या भरली होती करंडकी कस्तुरी

मज दौलतिची या जाणिव नव्हती परी

तव करस्पर्शने केली जादूगिरी

मन सुगंध हुंगुनि धुंद होउनी गेले

का भाव अंतरी उचंबळुनि दाटला ?

का व्याकुळ होउनि गहिवरला मम गळा ?

का फुले चांदने ? ही कोणाची कला ?

प्रेमाचे नाते जे ठरले ते ठरले !

घडणारच नव्हते ते घडले तुजमुळे

मिळणारच नव्हते ते तू मजला दिले

मजवरी उधळिली कल्पतरुची फुले

मम जीवन केले नंदनवन तू सगळे

मी होतो जीवनमार्गावर एकला

मागून येउनी साद दिली तू मला

होऊन उषा मम पथ पुढला उजळिला

मग गाउ लागले विहंगमांचे मेळे !

तू स्फूर्ती माझी, प्रतिभा मम लाडके

किति गाउ गोडवे, किती करु कौतुके !

मी कुमुद फुल्ल तव, हे माझ्या चंद्रिके

हे तुलाच अर्पण पहिलेच नि शेवटले !

Chapter ListNext »