Bookstruck

स्वर्गाकडे प्रयाण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

यादव कुळाचा नाश व विशेषतः कृष्णाचे निधन झाल्याचे ऐकताच पांडवांना फार दुःख झाले. अर्जुनाचे ह्रदय विदीर्ण झाले. पर्वत हालावा, सागर शोषला जावा तसे हे अघटित घडले आहे असे त्याला वाटले. व्यास प्रकट झाले व त्यांनी सर्वांचे सांत्वन केले. त्यांनी सांगितले कृष्णाला विधिलिखित माहीत होते; पृथ्वीला झालेला पापाचा भार नष्ट करून व जगाला पीडेतून सोडवून कृष्ण स्वस्थानला गेला. व्यास परतले पण पांडवांचा शोक शमला नाही. त्यांनी आवराआवर केली. दान धर्म केला! वारसांना राज्ये सोपविली व स्वर्गासाठी प्रयाण करण्याचे ठरविले. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला व उत्तर दिशेच्या मार्गाने द्रौपदीसहित ते चालत राहिले. योगबलाने वनातून, डोंगरातून मार्ग काढले. सर्वच पांडव क्षीण झाले. सर्वप्रथम त्यांच्या मागून चालणारी द्रौपदी गतप्राण होऊन पडली. भीमाने युधिष्ठिराला विचारले - 'हिने अधर्माचरण मुळीच केले नाही. तरी ही कशी गेली?' धर्म म्हणाला- 'हिने पक्षपात केला. पाच पती असून हिने अर्जुनावर जास्त प्रेम केले.' अशी प्रश्नोत्तरे सर्वांबद्दल झाली. एकेक पांडव गतप्राण झाला. शेवटी फक्त युधिष्ठिर व त्याचा कुत्रा एवढेच पुढे जात राहिले. युधिष्ठिर आपल्या पुण्यबळावर स्वर्गलोकात सदेह जाऊ शकत होता.

स्वर्गाकडे प्रयाण

योगेश्वर कृष्णाचे निधन ऐकले

स्वर्गप्रवासास व्यथित पार्थ निघाले ॥धृ॥

कालगती धर्मासी उमजली मनी

परिक्षिता हस्तिपुरि राज्य देउनी

वल्कल नेसून स्वये नगर सोडिले ॥१॥

धर्म पुढे श्वानासह पार्थ मागुती

शिणलेली पाञ्चाली असे शेवटी

चार दिशांचे सगळे तेज लोपले ॥२॥

दाट वनी योगबळे मार्ग काढती

मेरूवर नक्षत्रे जणू चालती

द्रौपदिची मंदमंद झालि पावले ॥३॥

पांचाली गतप्राण पडे भूवरी

पार्थांच्या दाटतसे शोक तो उर

काळाने एक एक पाश टाकले ॥४॥

पतिव्रता का पडली भीम पुसतसे

धर्म म्हणे "दोष तिच्या वर्तनीअसे

प्रेम तिने अधिक सदा अर्जुना दिले" ॥५॥

माद्रीचे जुळे पुत्र पडत भुवरी

का पडले सच्छिल हे, भीम विचारी

युधिष्ठीर सांगे "त्या दोष भोवले ॥६॥

सहदेव ज्ञानाचा गर्व तो असे

रूपगर्व नकुलाच्या मनी वसतसे

पाहिजेत अवगुण हे दूर ठेविले' ॥७॥

पराक्रमी सत्यनिष्ठ इंद्रसुत पडे

मृत्यूचे उल्लंघन का कुणा घडे?

प्रश्न तोच, उत्तर ते पांडव दिले ॥८॥

"सैन्य-नाश करण्या मज एक दिन पुरे

वचन इंद्र-पुत्राचे फोल हे ठरे

पतनाला कारण हे शब्द जाहले" ॥९॥

शेवटचे श्वास घेत भीम विचारी

देहपात का झाला सांग तू परी

क्षणार्धात धर्माचे वाक्य ऐकले ॥१०॥

"अन्नाचे अतिभक्षण तू करायचा

शक्तीचा गर्व धरुन दुःख द्यायचा"

हे दोष वृकोदरा तुजसी भोवले ॥११॥

कसातरी जात पुढे श्वान घेऊनी

चकित होय इंद्राच्या रथा पाहूनी

स्वर्गासी त्या नेण्या इंद्र अवतरे ॥१२॥

बंधुंना मृत बघता कंठ दाटला

गुण त्यांचे आठवता येइ उमाळा

शोकाकुल धर्माचे पाय थबकले ॥१३॥

« PreviousChapter ListNext »