Bookstruck

स्वर्ग प्रवेश

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

युधिष्ठिराला सदेह स्वर्गात नेण्याकरिता इंद्र अवतरला होता. आपल्या बरोबर असलेल्या श्वानासह आपणास न्यावे अशी विनंती युधिष्ठिराने केल्यावर इंद्राने त्यास नकार दिला. "या माझ्या एकनिष्ठ मित्राचा मी त्याग करणार नाही, याच्याशिवाय मला स्वर्ग नको." असे धर्माने म्हटल्यावर श्वानरूपातला यमधर्म प्रकट झाला व त्याने धर्माची प्रशंसा केली. ही युधिष्ठिराची परीक्षा होती. स्वर्गात जाताच धर्माला तेथे दुर्योधन व कौरव विराजमान दिसले. पांडव, द्रौपदी हे कोणीच दिसले नाहीत. ते नरकलोकात होते. त्याला तेथे नेण्यात आले. पुण्यवंत युधिष्ठिर नरकात उभा राहाताच तेथे अदृश्य रूपात असलेल्या पांडवांनी सांगितले की त्याचे क्लेश त्याच्या येण्यामुळे कमी झाले. तेवढ्यात इंद्र यमदि देव तेथे आले. धर्माने, पांडवांना नरकवास दिल्याबद्दल क्रोध व्यक्त केला. इंद्राला सांगितले की त्याला स्वर्ग नको, पांडवासमवेत तो नरकातच राहील. यमाने त्याच्या पांडवांवरील प्रेमाचे कौतुक केले व सांगितले की ही त्याने धर्माची तिसरी परीक्षा घेतली. पहिली यक्ष भेटीतली, दुसरी श्वानांसंदर्भातली व आता ही तिसरी. त्याने युधिष्ठिराच्या आचरणाची व थोर मनाची प्रशंसा केली.

स्वर्ग-प्रवेश

कसा हा दुर्योधन स्वर्गात

अधर्मा पूजी जो ह्रदयात ॥धृ॥

विराजतो हा दिव्य आसनी

कौरवही दिसती या स्थानी

कारस्थाने केली यांनी

संगे यांच्या राहु कसा मी? जिणे पुन्हा दुःखात ॥१॥

दुष्कर्मे केलीत भूवरी

पुण्य कोणते ह्यांच्या पदरी

घात आमुचा सदा अंतरी

अनेक पापे माथी असता, इथे कसे सौख्यात? ॥२॥

कर्ण, द्रौपदी, बंधु न दिसती

का न मिळावा स्वर्ग त्यांप्रती

जाइन मी ते जेथे असती

विपरीतच हे कसे घडावे दिव्य देवलोकात? ॥३॥

देवदुत त्या नरका आणती

आर्त ध्वनी त्या ऐकू येती

भार्या, बंधू त्यास विनविती

तुझ्या संगती नृपा यातना अमुच्या झाल्या शांत ॥४॥

पांचालीसुत पांडवभ्राते

कुणाचेच ना पातक दिसते

क्लेश किती हे भोगति येथे

धर्मा वाटे बुद्धिभ्रम का आहे मी स्वप्नात? ॥५॥

नृपनयनी आसवे दाटती

उद्वेगाने जळे नरपती

वदे धर्मसुत "हेच सोबती

इथेच राहिन, सांगा इंद्रा नको स्थान स्वर्गात" ॥६॥

निरोप ऐकुन येत सुरपती

यमधर्मादी देवहि येती

दया, प्रेम राजाचे बघती

बोले यम "तू धन्य पांडवा, धर्म तुझ्या रक्तात" ॥७॥

नरकलोक हा मायानिर्मित

नको पांडवा होऊ दुःखित

जाल सर्वही सुरलोकाप्रत

खरी गती स्वर्गाची तुमची रहा तिथे सौख्यात ॥८॥

यक्षरुपाने पहिल्या वेळी

तुझी परीक्षा मीच घेतली

इंद्ररथी चढताना दुसरी

परिक्षेत त्या दिसली करुणा मला, श्वानरूपात ॥९॥

आज परीक्षा तिसरी झाली

बंधुंसाठी तुवा त्यागिली

दिव्य सुखे ती स्वर्गामधली

धन्य नृपाळा कीर्ती गातिल तुझी मृत्युलोकात ॥१०॥

« PreviousChapter ListNext »