Bookstruck

कृष्णाला अभिवादन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भगवान श्रीकृष्णाचे निधन व नंतर लगेचच झालेले पांडवांचे स्वर्गगमन या घटनांच्या वर्णनाने महाभारताचा शेवट होतो. एका महान युगाचा अंत होतो. महाभारताच्या सर्व प्रमुख घटनांवर, पांडवांच्या खडतर पण ओजस्वी जीवनपटावर कृष्णाच्या दिव्य प्रभावाची छाया स्पष्ट दिसते. विष्णूने पृथ्वीचा भार नष्ट करण्याकरिता व धर्मस्थापनेकरिता कृष्णरूपाने अवतार धारण केला. महायुद्धात पांडवांना मिळालेला विजय कृष्णामुळेच मिळू शकला. कौरवांच्या सभेत वस्त्रे पुरवून द्रौपदीचे रक्षण, अर्जुनाच्या सारथ्याचा स्वीकार, अर्जुनाला गीतेचा उपदेश, समेटासाठी शिष्टाई, गांधारीचे सांत्वन, कर्णाचे मन वळविण्याचा प्रयत्न, कर्णार्जुन युद्धात अर्जुनाचे रक्षण, हे सर्व कृष्णाने पांडवांच्या हितासाठी केले. अर्जुनावर प्रेम असल्याने त्याला श्रेष्ठ ज्ञान दिले व त्याला कृतार्थ केले. त्याला दिव्य दृष्टी देऊन आपले सृष्टीला व्यापणारे विश्वरूप दाखविले. अशा या युगपुरुषाचे अगम्य व अलौकिक चरित्र व्यासांनी आपल्या महाकाव्यात रेखाटले आहे. त्या जगद्‌वंद्य योगेश्वर कृष्णाला शतशः प्रणाम!

कृष्णाला अभिवादन

जगद्‌गुरू जगदीश जनार्दन

अवतरला भूवरी, जनार्दन, कृष्णरूपधारी ॥धृ॥

गोकुळातले रम्य बालपण

नवनीताचे चोरुन भक्षण

माय म्हणे मुख दावी उघडुन

मुखात पाही रुष्ट यशोदा भुवने ती सारी ॥१॥

पाहुन मोहक रूप सावळे

गोपी विसरत भानच सगळे

राधेचे मन विलीन झाले

वेणुनाद ऐकता धावती कालिन्दीच्या तिरी ॥२॥

नरकासुर क्रूरास मारिले

बंधमुक्त वनितांना केले,

कालियास त्या जळी ठेचले

कालयवन-कंसादी वधिले दुष्ट दुराचारी ॥३॥

अग्रपुजेचा मान लाभला

राजसूयी त्या कलह माजला

राहि न संयम त्या शिशुपाला

शत-अपराधानंतर त्याच्या चक्र घातले शिरी ॥४॥

पांचालीवर ये आपत्ती

रिपू सभेतच वसन फेडिती

धावुन येई द्वारकापती

वसनावर वसने ती पुरवुन रक्षी गिरिधारी ॥५॥

पांडव पीडित वनवासाने

गांजुन गेले अन्यायाने

सभेस जाउन यदुराजाने

मदांध दुर्योधना विनविले समेट अजुनी करी ॥६॥

ज्येष्ठ असे तू पांडव कर्णा

कुष्ण वदे तू सोड कुरुंना

सूतपुत्र परि ते मानीना

युद्ध अटळ होताच जाहला पार्थ-सारथी हरी ॥७॥

भीष्मद्रोणकर्णादि रथींना

उपाय योजुन वधिले यांना

विजयी केले पांडुसुतांना

सूत्रधार, जगजेठी ज्यांचा पृथ्वी त्यांस वरी ॥८॥

शतपुत्रांचे निधन पाहता

बोले हरीला दुःखी माता

का न एकही ठेविले सुता

नाश यदुंचा होइल ऐसा वदली गांधारी ॥९॥

संभ्रम पाहुन पार्थ मनीचा

बोध दिला त्या साम्यबुद्धीचा

ज्ञानयोग, निष्काम-भक्तिचा

भगवंताची अमृत-गाथा जगतासी तारी ॥१०॥

देव, ऋषी या करिती वंदन

ज्ञानरूप हा, हा नारायण

धन्य धन्य ते पांडूनंदन

तया लाभला संग हरीचा, स्नेह तसा ईश्वरी ॥११॥

अवतरला भूवरी जनार्दन कृष्णरूपधारी ॥

॥ॐ नमो भगवते कृष्णाय ॥

« PreviousChapter ListNext »