Bookstruck

आदर्श पुरुष

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भीष्म धनंजय आणि युधिष्ठिर

विदुर कर्ण अथवा मधुसूदन

पुरुषांनी या सुखाहुनीही

अधिक भोगले दुःखाचे क्षण ॥१॥

भीष्म :

भीष्म जन्मले मुनिशापातुन

भूषविले ना कधि सिंहासन

घोर प्रतिज्ञा पाळित जगले

राजगादिचे करीत रक्षण ॥२॥

भीषण युद्धे सदा जिंकली

कृतार्थता परि कधि न लाभली

ज्येष्ठ श्रेष्ठ परि हृदयी अगतिक

रणात अंती आहुती दिली ॥३॥

युधिष्ठिर :

युधिष्ठीर धर्माची मूर्ती

विपत्तीत परि काळही गेला

क्षणात द्यूताच्या क्रीडेतच

सम्राटाचा सेवक झाला ॥४॥

वनी पुन्हा तो पाही स्वप्‍ने

गावे पाचही परी न मिळती

युद्धातिल तो विनाश बघता

राज्य नकोसे भासे अंती ॥५॥

अर्जुन :

पार्थ जगाचा श्रेष्ठ धनुर्धर

परि राही वनि तृणशय्येवर

जये जिंकले शिवा किराता

बृहन्नडा झाला तो नरवर ॥६॥

घोष धनूचा ऐकुन ज्याच्या

सैन्य कापती रणारणातुन

सुत इंद्राचा सखा हरीचा

युद्धारंभी होइ धैर्यहिन ॥७॥

दुर्योधन :

मदांध मानी होता कुरुपती

राज्यलोभ परि त्या आवरेना

अव्हेरुन कृष्णाच्या वचना

बंधुंसह तो मुकला प्राणा ॥८॥
अधर्मभोक्‍ता वदे सुयोधन

धर्म जाणतो मीहि मनातुन

परि कधि मज बुद्धि न होई

धर्मपथावर जावे चालुन ॥९॥

कर्ण :

कर्ण कुणाचा हे नच कळले

’सूत’ म्हणोनी हीन लेखिले

दानव्रताला जाणुन त्याच्या

इंद्र नेली दिव्य कुंडले ॥१०॥

प्रताप होता विदित जगाला

शापाने परि व्यर्थ ठरविला

कळले अंती पांडु-पुत्र तो

तरी नृपास्तव प्राण अर्पिला ॥११॥

विदुर :

उपेक्षिताचे जीवन जगला

दासिपुत्र हा विदुर सद्‌गुणी

अवमानित त्या करी कुरुपती
नीतिनिपुण जरि होता ज्ञानी ॥१२॥

कृष्ण :

कृष्णाच्याही आले नशिबी

कृष्णेसह पांडवा रक्षिणे

मातृसुखाला वंचित होणे

यदुवंशाचा विनाश बघणे ॥१३॥

दुष्ट सुयोधन कंसादींचे

धर्म रक्षिण्या केले कंदन

सर्वेश्वर हरिचा परि झाला

करुण अंत शर चरणालागुन ॥१४॥

« PreviousChapter ListNext »