Bookstruck

पालकांची भूमिका महत्त्वाची

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मासिकस्त्रावाविषयीची माहिती तशी शिक्षक, आरोग्य कार्यकर्ते यांच्याकडून किंवा पुस्तके अथवा शैक्षणिक माहितीपटांतूनही मिळवता येते. बरेच आईवडील मान्य करतात की या माध्यमांतून पाळीशी संबंधित असलेली शास्त्रीय माहिती तसेच मासिकस्त्राव होताना कोणते स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत याविषयी बरीच उपयुक्‍त माहिती मिळवता येते. तरीपण मुलींच्या मनात आणखीही बरेच प्रश्‍न किंवा शंका असतात ज्यांचे समाधान या माध्यमांकडून होऊ शकत नाही. पाळी सुरू झाल्यावर काय करायचे हे त्यांना माहीत असले तरी ज्या निरनिराळ्या भावभावनांचा मासिकस्त्रावाशी संबंध जोडला जातो त्यांना कसे तोंड द्यायचे हे त्यांना नेमके माहीत नसते.

आजी, मोठी बहीण आणि विशेषतः आई, ही अतिरिक्‍त माहिती आणि आवश्‍यक भावनिक आधार मुलींना पुरवू शकते. बहुतेक मुली पाळीबद्दल मनात असलेले प्रश्‍न आणि शंका आईलाच विचारतात.

वडिलांबद्दल काय? बऱ्‍याच मुलींना पाळीबद्दल आपल्या वडिलांशी बोलायला लाज वाटते. काही मुली वडिलांशी याविषयी बोलायला लाजतात पण त्यांनी आपल्याला समजून घ्यावे, आधार द्यावा अशी अपेक्षा मात्र करतात. तर काहीजणींना वडिलांजवळ याबाबतीत उल्लेखही करायला आवडत नाही.

ज्या कुटुंबांत आई नाही, फक्‍त वडील आहेत अशा कुटुंबांची संख्या मागच्या काही दशकांत बऱ्‍याच देशांत वाढली आहे.* साहजिकच, बऱ्‍याच वडिलांना आपल्या मुलींना पाळीविषयी माहिती देण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या वडिलांना मासिकस्त्रावाविषयी तसेच त्यांच्या मुलींना अनुभवाव्या लागणाऱ्‍या शारीरिक व भावनिक बदलांसबंधी काही मूलभूत माहिती असणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात माहिती व सल्ला घेण्यासाठी ते स्वतःच्या आईची किंवा बहिणींची मदत घेऊ शकतात.

« PreviousChapter ListNext »