Bookstruck

गोड निबंध - २ 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

९ सुंदर कवितांचे गद्य अनुवाद

एका इटॅलियन कवीची एक सुंदर कविता

आकाशांत एवढे तारे कां बरें चमकत आहेत?  आकाशांतून इतके तारे कां तुटत आहेत?  मला माहीत आहे. आकाशांतून हे दंवबिंदू कां बरें टपटप पडत आहेत, हे अश्रुपूर का बरें?  मला माहीत आहे.

एक चिमणी एकदां आपल्या घरटयांत परत येत होती, परंतु त्या दुष्टांनीं तिला मारलें.  ती चिमणी काटयांत पडली.  तिच्या लहानशा चोंचींत तिनें एक किडा धरून आणला होता;  आपल्या पिलांसाठी तो फराळ ती नेत होती.  परंतु अरेरे, ती आतां काटयांत पडली आहे.  आकाशाकडे दृष्टि लावून तो किडा तसाच चोंचींत धरून ती पडली आहे.  तिच्या घरटयांत तिचीं पिलें वाट पहात आहेत, चिंवचिंव करीत आहेत! 

त्या चिमणीप्रमाणेंच एक मनुष्य आपल्या घरीं येत होता;  परंतु वाटेंत त्याला वाटमा-यांनी मारलें.  तो मरतांना म्हणाला, 'मला मारणारांना क्षमा करतों.'  त्याच्या डोळयांत ईश्वराला मारलेली हांक दिसत होती व दोन अश्वबिंदू चमकत होते.  त्यानें आपल्या मुलांसाठी दोन लहानशा बाहुल्या बरोबर आणल्या होत्या.  घरीं आपले बाबा आतां परत येतील कांहीं तरी घेऊन येतील, अशी त्यांची मुलें वाट पहात आहेत!  वेडीं मुलें उगीच वाट पाहात आहेत.  हा तर इकडे एकटा मरून पडला आहे;  त्याचे प्राण गेले आहेत.  हातांतील दोन बाहुल्या तशाच त्याचे हातांत धरलेल्या त्याच्या छातीवर आहेत.  त्या ता-यांना तो दाखवीत आहे.

हे अनंत परमेश्वरा! हे शाश्वत ईश्वरा!  हें जगांतील क्रौर्य पाहून हें अनंत आकाश तारकारूपी अश्रूंनी तूं भरून टाकलें आहेस.  हे तुझे अनंत अश्रू वरतीं अनंत आकाशांत चमकत आहेत. हे पहा!



« PreviousChapter ListNext »