Bookstruck

गोड निबंध - २ 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका इटॅलियन कवीनें केलेले बैलाचे वर्णन

हे पवित्र बैलोबा, मला तूं फार आवडतोस.  मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतों.  तुला पाहिलें कीं धैर्याचे, उत्साहाचें, शांतीचें चित्र माझ्या चित्तासमोर उभें राहतें.  तूं किती गंभीर आहेस! जणूं एकादा पुतळाच! अफांट व सुपीक शेताकडे तूं आपली शांत दृष्टि लाविली आहेस; तुझ्या मानेवर जूं ठेवलें तर शांतपणें आपली मान तूं खालीं वाकवतोस.  मनुष्याचें काम लौकर व्हावें म्हणून तूं आपली सर्व शक्ति त्याच्या ठायी खर्च करतोस, मनुष्य तुझ्यावर संतापतो, तुझ्या अंगावर वस्कन् येतो, तुला आरीनें टोंचतो, चाबकानें मारतो.  परंतु बेटा, तूं तें सर्व कीं रे सहन करतोस!  त्यानें तुला टोंचलें, मारलें तर तूं आपली शांत, सोशिक दृष्टि त्याच्याकडे वळवतोस व मुकेपणाच्या बोलण्यानें त्याला सांगतोस 'नाहीं का रे मी तुझ्या ठायीं मरमर काम करीत? नाहीं का रे कष्ट करीत?  कां बरें मला विनाकारण छळतोस?'  काम करून विस्तृत  झालेल्या तुझ्या नाकपुडयांतून जोरजोरानें श्वासोच्छ्वास होत असतो.  काळया ओलसर धुराचे लोटच जणूं तुझ्या त्या नाकांतून बाहेर पडत असतात!  कधीं कधीं तूं डुरकतोस, तें तुझें डुरकणें शांत वेळीं किती गंभीर व मौजेचें वाटतें! हे बैलोबा! तुझ्या त्या निळसर मधुर अशा दृष्टींत, तुझ्या त्या इंद्रनील मण्यासम दृष्टींत, त्या तुझ्या विशाल दृष्टींत सर्व सृष्टीचें हरितश्यामलरूप जणूं प्रतिबिंबित आहे!

*            *        *

[वाल्ट व्हिटमन हा थोर अमेरिकन कवि गेल्या शतकांत झाला.  त्याच्या दोन कवितांचा अनुवाद देत आहें.]

« PreviousChapter ListNext »