Bookstruck

गोड निबंध - २ 72

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हिंदी आपली राष्ट्रभाषा.  पण तिच्या बाबतींतहि भांडणे चालू आहेत;  तिलाहि विरोध होत आहे.  ती ऊर्दूनिष्ठ असावी कीं, संस्कृतनिष्ठ असावी अशा भांडणांत काय अर्थ आहे!  हिंदुस्थान हें एक मोठें राष्ट्र आहे.  निरनिराळया लोकांना समजेल अशीच भाषा येथें बोलली गेली पाहिजे.  हिंदु संस्कृतज्ञ माणसापुढें संस्कृतनिष्ठ भाषा बोला. मुसलमान ऊर्दू जाणणा-यांपुढे ऊर्दूनिष्ठ बोला.  कुटुंबात कांही भाऊ असले तर वडील भावाला मान मिळतो खरा सर्वांत अधिक, पण स्वार्थत्यागहि अधिक करावा लागतो.  हिंदुस्थान हें मोठें राष्ट्र आहे.  त्यालाहि जगांत पुढें येण्यासाठीं अधिक स्वार्थत्याग करावा लागेल, तो सहन केला पाहिजे.

आतापर्यंत जनतेची धार्मिक विभागणीं होऊं शकत नाहीं, आर्थिकच होते हें सांगितलें.  तेव्हां कशासाठीं जगायचें व कशासाठी मरायचें हें ठरवून टाका!  दु:खी जनतेला सुखी करण्यासाठीं जगायचें की दु:खी जनतेच्या दु:खात अधिक भर टाकण्यासाठीं?  जगाचे दोन मोठे भाग आहेत. श्रीमंत दरिद्री! तुम्ही आपल्या मनाला विचारा.  बाबा रे तूं कोठल्या बाजूचा?

आज आपली काँग्रेस साम्यवादी नाहीं तरी तिकडे जराशी झुकते आहे.  तिला लाल रंग चढत आहे.  राष्ट्रांत कुणीच दु:खी नको म्हणून ती उभी आहे.  तिला पुढें नेण्याचे हें काम, तिला जोराने हातीं घ्यायला लावण्याचें काम विद्यार्थ्यांनो, तुमचें आहे.  काँग्रेसवर सर्व जण रागावतात पण म्हणून मला ती अधिक पूज्य वाटते.  -- ती सर्वांना सांभाळण्याचा प्रयत्न करते.  वर्ग समन्वयाचा महात्माजींचा महान् प्रयत्न फसला तर काँग्रेसपाशी दुसरा प्रयत्न सज्ज आहेच कीं - वर्गयुध्दाचा!  महात्माजी काँग्रेसला थोपवून धरतील तर आपण तिला पुढें नेली पाहिजे.  काँग्रेसवर रागावून कसें चालेल?

काँग्रेस मुसलमानधार्जिणी आहे म्हणे.  अरे, कसली धार्जिणी नि काय घेऊन बसला आहांत रे!  मुसलमान आमचेच ना? आपल्यांतलेच धर्मांतर करून गेले असें तुम्हीच म्हणतां ना मग ते वाईट कसे रे? तुमचाच भाग मग वाईट कां म्हणता?  प्रार्थनेवरून आपसांत भांडूं नका.  स्वातंत्र्यासाठीं परक्यांशी--ब्रिटिशांशीं भांडा--प्राथर्नेसाठीं कुठेहि तोंड करा पण स्वातंत्र्यासाठी सर्वांची तोंडे एकाच दिशेकडू वळूं द्या !  केमालपाशानें स्वातंत्र्याच्या आणि प्रगतीच्या मार्गात अडथळे होतात म्हणून धर्ममंदिरांचे उच्चाटन केले तर अहरार पक्षानें सर्वांच्या अगोदर स्वातंत्र्य-संग्रामाचें रणशिंग फुंकलें.

« PreviousChapter ListNext »