Bookstruck

प्राचीनत्व

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञ यामध्ये होतो.परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या ,आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केंव्हा सुरु झाली याची नोंद नाही.

« PreviousChapter ListNext »