पुसलेलं कुंकू शापित जीवन
'पुसलेलं कुंकू ' शापित जीवन
सायंकाळची वेळ होती .मी घरात एकटीच होते .पहाटेच्या ट्रेन नी मुंबईला जायचे म्हणून तयारी करीत होते . पती आजच दुपारी पुण्याला गेले होते . घरात आम्ही दोघेच जण असल्याने मला पहाटे साडेतीन वाजता स्टेशनवर कोण नेऊन सोडेल हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता . एकटं कसं जायचं स्टेशनवर ह्या विचाराने माझ्या मनांत असंख्य विचारांचे काहूर माजले होते . आमचं छोटंसं शहर त्यात एकही कंपनी नाही . औद्योगिक क्षेत्र नसल्याने तिथे रात्री रस्त्यांवर निरव शांतता पसरली असते .
सकाळी पाच नंतर फिरायला जाणार्यांची किरकोळ वर्दळ दिसूं लागते .
माझी ट्रेन पहाटे चार ची होती म्हणून मला घरातून पहाटे साडेतीनला च बाहेर पडावे लागणार होते . काय करावे सुचत नव्हते . मी सहज आमच्या शेजारच्या ताईं जवळ माझ्या मनांत उठलेले असंख्य विचारांचे काहूर त्यांना सांगितले . शेजारच्या ताई पतीच्या निधनानंतर त्यांच्या आई बरोबर राहत होत्या . पतीचे निधन झाले तेव्हा त्यांची मुले लहान होती . पतीच्या मागे त्यांनी मुलांचे शिक्षण केले त्यांचे लग्न लावून दिले . हे सर्व करीत असताना त्यांच्या समोर अनेक समस्या आल्या मोठ्या खंबीरपणे सर्व समस्यांना तोंड दिले . मला एकदा बोलता बोलता त्यांनी सांगितले होते . वेळ प्रसंगी दोन तीन रिक्षा चालकांचे फोन नंबर फोन मध्ये राहू द्यावे लागतात . कधी दवाखान्यात घरात म्हातारे माणसं असतात कधी काही दुखलं खुपलं तर पटकन फोन करुन बोलवता येतं . मी त्यांना सांगितले "ताई रिक्षा चालकाचा मोबाईल नंबर द्या , मला सकाळी स्टेशनवर जाण्यासाठी बोलवावे लागेल सकाळी साडे तीन वाजता रिक्षा बोलावून स्टेशन वर जाणेच योग्य आहे ." बस ! मी फक्त इतकंच त्यांना म्हणाली .
आणि त्यांच्या मनातील समाजा बद्दल असलेला राग लगेचच त्यांच्या शब्दातून बाहेर पडू लागला . त्यांचा एक एक शब्द विचार करायला भाग पाडणारा होता . त्या बोलू लागल्या आणि मी शांतपणे उभी राहून ऐकत होते . आता समजलं असेल ताई तुम्हाला पती नसतांना कसं जगणं मुश्कील होतं ते बाईचं . फक्त एकदाच तुमच्यावर स्टेशनवर एकटी जायची वेळ आली तर किती त्रास दायक वाटतंय तुम्हाला मी कसं केलं असेल ? अठरा वर्ष झालेत आमच्या ह्यांना जाऊन . ताई खुप कठीण असतं एका तरुण विधवा बाईचं जीवन . सर्वांचे लक्ष तिच्या कडे असते . तीचं हसणं ,तीचं बोलणं ,ती कोणाकडे जाते ,कुठे जाते , तीच्या घरी कोण येतं हे सर्व बारकाईन निरक्षण केलं जातं . तीचं हसणं ब़ोलणं तीचं सारखं सारखं घराबाहेर पडणं हा समाजात चर्चेचा विषय ठरतो . ती साधी भाजी घ्यायला जरी बाहेर आली तरी तीच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं ती कुठे बघते कोणाकडे बघते . अगदी नजर कैदेत ठेवल्या सारखी वागणूक विधवा बाई ला समाजात मिळत असते . तीला मदतीची गरज पडली तर तिथून नातेवाईक अलगद काढता पाय घेतात . जर कोणी पुरुषाने मदत केली तर लगेच तिला संशयाच्या नजरेने पाहतात . समाज कधी हा विचार करत नाही ती कसं तीचं घर चालवत असेल ? तीच्या मुलांचे एडमिशन साठी बाहेर गावी कोण जात असेल ? मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा ती कोठून उभा करत असेल? आशा अनेक प्रकारच्या समस्यांना ती कशाप्रकारे तोंड देत असेल ? त्या बोलत होत्या त्यांचा एक एक शब्द मनाला सुन्न करणारा होता . आजही एकविसाव्या शतकात आपल्या देशात विधवा स्त्रियांना समाजा कडून दिली जाणारी वागणूक मान खाली घालायला लावणारी आहे .
पूर्वीच्या काळी भारतात सती जायची प्रथा होती उलट ते तरी बरं होतं स्री अशा नजर कैदेतून तरी सुटून जात असे . असं माझ्या मनात सहज आलं .
पती निधनानंतर बाईचं जीवन म्हणजे सामाजिक नजर कैदेचा शाप .
हे आता कुठे तरी थांबयला हवं .
कुठवर तीने समाजाच्या नजर कैदेत राहायचं . ????