Bookstruck

अब्बूखाँकी बकरी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लहानशा अंगणात बक-या कंटाळून पळून जात असतील असे मनात येऊन त्याने एक नवीन मोठे वाडगे तयार केले. चारी बाजूंनी कुंपण घातले. चांदणीच्या गळयात लांब दोरी बांधली. त्यामुळे ती खुंटयाला बांधलेली असली तरी दूरवर फिरू शके.

अब्बूखाँला वाटले की, चांदणी आता रमली. परंतु ती त्याची भूल होती. स्वातंत्र्याची भूक अशी लवकर मरत नाही. पहाडात स्वातंत्र्यात नांदणा-या जनावरांना चार भिंतीत मेल्यासारखे होते व गळयातील दोरी तोडण्याचा प्रयत्न सुरू होतो.

एक दिवस सकाळी रवंथ करीत असता चांदणीचे डोळे एकदम पहाडाकडे गेले. सूर्य अद्याप डोंगराच्या आडच होता. त्याचे कोवळे सोनेरी किरण शुभ्र पहाडावर पडून अवर्णनीय शोभा दिसत होती. चांदणी मनात म्हणाली, ''तेथे किती मौज असेल? तेथील ती मोकळी हवा कोठे व इथली कोंदट हवा कोठे? तेथे नाचता-कुदता येईल, खेळता-खिदळता येईल. येथे तर अक्षय्य ही मानेला गुलामगिरीची दोरी. अशा या गुलामीच्या घरात दाणे खायला मिळतात म्हणून गाढवांना फार तर राहू दे. खेचरांना राहू दे. आम्हां बक-यांना विशाल मैदानातच मौज.''

चांदणीच्या मनात हे विचार आले, या भावना उसळल्या आणि चांदणी पूर्वीची राहिली नाही. तिचा आनंद लोपला. तिचा हिरवा चारा आवडेना, पाणी रुचेना. अब्बूखाँच्या गप्पा तिला नीरस वाटत. ती कृश होऊ लागली. तिचे दूध आटले. सारखे पहाडाकडे डोळे. 'बें बें' करून दीनवाणी रडे, दोरीला हिसके देई. अब्बूखाँला बक-यांचे बोलणे समजू लागले होते. प्रेमामुळे त्यांची भाषा तो सहज शिकला. 'मला पहाडात जाऊ दे, येथे नाही माझ्याने राहवत' हे चांदणीचे शब्द ऐकून तो चमकला. त्याचे अंग थरारले. हातातील मातीचे दुधाचे भांडे खाली पडले व फुटले.

अब्बूखाँने करुण वाणीने विचारले, ''चांदणी, तूही मला सोडून जाणार?''
ती म्हणाली, ''हो, इच्छा तर आहे.''
अब्बूखाँ म्हणाला, ''येथे का तुला चारा मिळत नाही? सायंकाळी दाणे देतो, ते किडलेले असतात? आज चांगले दाणे आणीन.''
बकरी म्हणाली, ''खाण्यापिण्याकडे माझे लक्षही नाही.''
त्याने विचारले, ''मग का दोरी आणखी लांब करू?''
ती म्हणाली, ''त्याने काय होणार?''
अब्बूखाँने विचारले, ''मग पाहिजे तरी काय?''
ती म्हणाली, ''पहाड. मला पहाडात जाऊ दे.''
तो म्हणाला, ''वेडी आहेस तू. तेथे लांडगे आहेत. ते आले म्हणजे काय करशील?''
ती म्हणाली, ''देवाने दिलेल्या शिंगांनी त्यांना मारीन.''

« PreviousChapter ListNext »