Bookstruck

अब्बूखाँकी बकरी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तो म्हणाला, ''वा:! लांडग्याला मारणार ना तू? वेडये, त्याने आजपर्यंत माझ्या किती बक-या मटकावल्या! त्या माझ्या बक-या तुझ्यापेक्षा मोठया होत्या. कल्लू बकरी तू पाहिली नाहीस. कल्लू का बकरी होती! छे. जणू काळे हरिण होते हरिण! कल्लू रात्रभर लांडग्यांशी शिंगांनी झुंजली. परंतु उजाडता उजाडता लांडग्याने शेवटी तिला मारले व खाल्ले.''

चांदणी म्हणाली, ''गरीब बिचारी कल्लू. परंतु ते काही असो. मला पहाडातच जाऊ दे.''

अब्बूखाँ रागाने म्हणाला, ''तू पण लांडग्याच्या पोटात जाऊ पाहतेस. मला सोडू पाहतेस. कृतघ्न आहेस तू. मी तुला जाऊ देणार नाही. तुला तुझ्या इच्छेविरुध्द वाचवणार. तुझा हेतू कळला. तुला घरात कोंडून ठेवतो, नाही तर संधी मिळताच पळशील.''
''असे म्हणून अब्बूखाँने तिला घरात बांधले. दाराला कडी लावून गेला, परंतु बिनगजाची खिडकी उघडी होती. अब्बूखाँ बाहेर पडतो न पडतो तो चांदणी खिडकीतून पळून गेली!''

उंच पहाडावर ती गेली. तिच्या आनंदाला सीमा नव्हती. मुकतीचा आनंद मुक्तच जाणे. तिने लहानपणी डोंगरावरची झाडे पाहिली होती. परंतु आज त्या झाडात काही विराळीच गोडी तिला वाटत होती. जणू ते सारे वृक्ष उभे राहून पुन्हा येऊन पोचल्याबद्दल तिला धन्यवाद देत होते, तिचे स्वागत करीत होते!

नाना प्रकारची फुले फुलली होती. शेवंतीची फुले आनंदाने हसू लागली. डोलू लागली. उंच उंच गवत चांदणीच्या गळयाला मिठी मारू लागले. तिचे अंग कुरवाळू लागले. बंधनात पडलेली ती छोटी बकरी पुन्हा आलेली पाहून त्या सा-या पहाडाचा आनंद गगनात मावेना. चांदणीची मन:स्थिती कोण वर्णील? आता ना ते बाडगे, ना ते कुंपण, ना ती गळयातील दोरी, ना तो खुंटा आणि तो पहाडातील सुगंधी चारा तसा गरीब अब्बूखाँला तर कधीही आणता येत नसे.

चांदणी स्वातंत्र्याचा आनंद अनुभवू लागली. ती इकडे उडी मारी, तिकडे कुदी मारी, इकडे धावे, तिकडे पळे. ती पाहा घसरली, परंतु पुन्हा सावरली. आजवर बांधलेला उत्साह शतमुखांनी प्रगट होऊ लागला. एक चांदणी आली, परंतु सा-या पहाडात जणू नवचैतन्य आले. नवीन प्रकारचे तेज आले. जणू दहावीस बक-या सुटून आल्या होत्या! तिने गवत खाता खाता जरा मान वर करून पाहिले तो खाली अब्बूखाँचे घर दिसले. ती मनात म्हणाली, ''त्या चार भिंतींच्या आत मी कशी राहिल्ये? इतक्या दिवस त्या घरकुलात कशी मावल्ये? कसे सारे सहन केले?'' त्या उंच शिखरावरून तिला खालची सारी दुनिया तुच्छ व क्षुद्र वाटत होती.

« PreviousChapter ListNext »