Bookstruck

अब्बूखाँकी बकरी 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सा-या जन्मात नाचली बागडली नसेल, हसली कुदली नसेल, इतकी ती आज हसली कुदली. वाटेत तिला एक पहाडी बक-यांचा कळप भेटला. त्यांच्याशी थोडी बातचीत झाली. तरुण बकरेही तिच्याभोवती जमले. परंतु पांढ-या ठिपक्यांचा एक काळा बकरा होता; चांदणी व तो जरा लांब गेली. त्यांची काय बोलचाली झाली कोणाला माहीत? तेथे एक स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्याला कदाचित माहीत असेल. त्याला विचारा. परंतु तोही कदाचित सांगणार नाही.

चांदणी पुन्हा बंधनात पडू इच्छीत नव्हती. तो ठिपकेवाला काळा बकरा निघून गेला. सायंकाळ झाली. सारा पहाड लाल झाला होता. चांदणी मनात म्हणाली, ''सायंकाळी झाली! आता रात्र येणार.''

खाली पहाडात कोणी धनगर बक-यांना कवाडात कोंडीत होता. त्यांच्या गळयांतील छोटया घंटांचा आवाज येत होता. तो आवाज चांदणीच्या परिचयाचा होता. तो घंटांचा आवाज ऐकून ती जरा उदास झाली. अंधार पडू लागला. तो ऐका 'खू खू' आवाज एका बाजूने येत आहे.

तो आवाज ऐकताच लांडग्याचा विचार चांदणीच्या डोक्यात आला. दिवसभर लांडग्याचा विचारही मनात आला नाही. खालून अब्बूखाँच्या बिगुलाचा, शिट्टीचा आवाज ऐकू येत होता. 'चांदणी, परत ये' असे तो आवाज म्हणत होता. इकडून लांडग्याचा 'खू खू' आवाज येत होता.

कोठे जावयाचे? क्षणभर चांदणीने विचार केला. परंतु तिला तो खुंटा, त्या भिंती, ते कुंपण, ती गळयाभोवतालची दोरी, सारे आठवले. ती मनात म्हणाली, 'गुलामगिरीत जगण्यापेक्षा येथे स्वातंत्र्यात मरण बरे.' अब्बूखाँची शिट्टी ऐकू येईनाशी झाली. पाठीमागून पानांचा सळसळ आवाज झाला. चांदणीने मागे वळून पाहिले तो, ते टवकारलेले दोन कान. ते अंधारात चमकणारे दोन डोळे! लांडगा जवळ आला होता.

 

« PreviousChapter ListNext »