Bookstruck

समाजाचे प्राण 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार? गार वारा वाहत होता. जवळच्या शेतातून कोल्हे ओरडत होते. मुले मातांना घट्ट बिलगत होती. लहानगा धीट रमेश मात्र ड्रायव्हरला म्हणाला, ''पों पों वाजय म्हणजे कोल्हे भिऊन पळून जातील.''

तिकडून एक वृध्द मुसलमान आला. तो उंच होता. त्याच्या हातात काठी होती. जवळच्या खेडयातील तो होता. लहान होते ते खेडे. वीस-पंचवीस घरांची वस्ती होती. तो मुसलमान तेथील पुढारी होता. पूर्वीचे खानदानी घराणे; परंतु आता त्याला गरिबी आली होती. तो मोटारजवळ आला व म्हणाला, ''गावात चला. येथे वा-यात का राहता? बालबच्चे बरोबर आहेत. डाळ-रोटी खा. सामान देतो. गावात रात्रीचे निजा. सकाळी मोटार दुरुस्त झाली की जा.''

प्रवासी मंडळी बोलेनात. धीट रमेश म्हणाला, ''चला जाऊ गावात; परंतु आम्हांला दूध द्याल का होदाढीवाले?'' दाढीवाला म्हणाला, ''हां बेटा, गायीचे दूध देईन. चला सारे.'' तो वृध्द मुसलमान आग्रह करू लागला. शेवटी भाऊ म्हणाले, ''चला जाऊ. येथे रानावनात मुलाबाळांस घेऊन कसे राहावयाचे?''

ती मंडळी गावात आली. त्यांना रसोईचे सामान देण्यात आले. मुलांना दूध मिळाले, सर्वांची जेवणे झाली. दाढीवाल्याने विचारले, ''आत निजता की बाहेर? आतील ओटी मोकळी करून देतो. बाहेर गार वारा आहे. मुलाबाळांस बाधेल.''  मंडळी म्हणाली, ''येथे बाहेरच बरे.'' त्यांना झोरे देण्यात आले. घरातील होते नव्हते ते पांघरावयास देण्यात आले.

काहींना झोप लागली, काही जागे होते. एकजण म्हणाला, ''मुसलमानाच्या घरी येण्यापेक्षा रानात पडलो असतो तरी बरं. वाघाचा विश्वास धरवेल एक वेळ, परंतु यांचा नाही धरता येणार. भाऊ, हा तुमचा वेडेपणा. येथे बरे-वाईट झाले तर? विश्वास दाखवून गळे कापले गेले तर?''

भाऊ बोलले नाहीत. पलीकडे गाय झोपली होती. तिचे वासरू विश्वासाने झोपले होते. बुध्दिमान माणसाला कोठला विश्वास? परंतु हळूहळू सारे झोपले. पहाटेचा कोंबडा आरवला. वृध्द मुसलमान नमाज पढण्यासाठी उठला. रमेशच्या अंगावर पांघरूण नव्हते. वृध्दाने अंगावरची चादर त्याच्या अंगावर घातली.

« PreviousChapter ListNext »