Bookstruck

समाजाचे प्राण 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सगळी मंडळी उठली. शौच-मुखमार्जने झाली. त्यांना चहापाणी करण्यात आले. ''रमेश, तुला दूध पाहिजे ना?'' वृध्दाने विचारले, रमेश हसला. तो  म्हणाला, ''तुम्ही घातलेत वाटते मला पांघरूण? कशी ऊब आली होती!'' रमेश गायीचे दूध प्याला. मंडळी जायला निघाली. वृध्द मुसलमान जरा घरात गेला. मंडळीत कोणी म्हणाला, ''सुटलो एकदाचे.'' ते शब्द त्या मुसलमानाच्या कानी पडले. तो चमकला. त्याच्या हृदयाची कालवाकालव झाली. तो काप-या आवाजाने म्हणाला, ''असे का म्हटलेत?'' उत्तर मिळाले, ''तुमची भीती वाटत होती. मुसलमानांवर विश्वास कसा राखावा?''

दाढीवाला काही बोलला नाही. त्याला बोलवेच ना. मोटारीपर्यंत तो पोचवायला गेला. मोटार दुरुस्त झाली होती. मंडळी आत बसली. दाढीवाला बाहेर उभा होता. त्याच्या डोळयांतून अश्रू आले. पिकलेल्या दाढीवरून ते खाली आले. किती पवित्र होते ते दृश्य! तो शेवटी म्हणाला, ''सारे मुसलमान वाईट नका समजू. असे समजणे देवाचा अपमान आहे. माझ्या अश्रूंनी माझ्या बंधूंचे पाप कमी होवो!''

सारे स्तब्ध होते. बाळ रमेश दाढीवाल्याकडे बघत होता, या वृध्दाने एकदम पुढे होऊन रमेशच्या तोंडावरून हात फिरवले व त्याचे चिमुकले हात हातात घेतले. रमेश म्हणाला, ''तुम्ही छान आहात. तुमच्या गायीचे दूध छान आहे.'' दाढीवाला अश्रूंतून हसला. मोटार सुरू झाली. भाऊंनी कृतज्ञ व साश्रू नयनांनी वृध्दाकडे पाहून प्रणाम केला. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले.
गेली मोटार. वृध्द तेथे उभा होता. मोटारीत भाऊ म्हणाले, ''प्रत्येक समाजात हृदये जोडणारे असे देवाचे लोक आहेत, म्हणून जग चालले आहे. असे लोक समाजाचे प्राण. त्यांच्याकडे आपण बघावे व जीवन उदार, प्रेमळ व सुंदर करण्यास आशेने झटावे.''

« PreviousChapter ListNext »