Bookstruck

अधिक थोर देणगी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इटलीच्या दक्षिण भागातील एका दूरच्या गावात दोन मुले रहात होती. त्या गोष्टीला दोनशेंहून अधिक वर्षे झाली. त्या दोघांचे एकमेकांवर फार प्रेम. एकाचे नाव मेरियो, दुस-याचे ऍन्सेलमो. मेरियो एका श्रीमंत जमीनदाराचा मुलगा होता. तो हुशार होता, महत्त्वाकांक्षी होता. परंतु ऍन्सेलमो पुढे पुढे करणारा नव्हता. जोडे शिवणा-या एका गरिबाचा तो मुलगा होता.

दोघे मित्र हिंडाफिरायला जायचे, भविष्याबद्दल बोलायचे. मेरियो गंभीरपणे म्हणायचा, ''मी मोठा धर्मोपदेशक होईन. आईबापांची ती इच्छा आहे. मोठया व्यासपीठावरून बोलेन. राजेमहाराजे ऐकतील. भालदार-चोपदार ललकारतील.''

एके दिवशी दोघे मित्र एका द्राक्षमंडपात बसले होते. मेरिया म्हणाला, ''धर्मोपदेशक व्हायचे म्हणजे उत्कृष्ट वक्तृत्व हवे. या देणगीशिवाय फुकट.''

ऍन्सेलमोने आपल्या मित्राकडे भावपूर्ण दृष्टीने, उत्कटतेने पाहिले. आणि सकंप आवाजात तो म्हणाला, ''मेरियो, देवाने ती देणगी तुला द्यावी म्हणून मी रोज प्रार्थना करीन.'' धर्मोपदेशक होऊ इच्छिणारा मेरियो धर्मप्रवृत्तीचा नव्हता. मानमान्यता, झगमगाट यांचा तो भुकेला होता. त्याला मित्राचे शब्द ऐकून थोडे हसू आले. ऍन्सेलमोच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ''तू प्रार्थना करशील. कर. मी आभारी राहीन. परंतु काही झाले तरी मला वक्तृत्वकलेचा अभ्यास करायला हवा.''

आणि पुढे मेरियो धर्मसंस्थेत शिरला. तो एका गावचा बिशप झाला. ऍन्सेलमोला विरह सहन होईना. तोही मित्र ज्या गावी गेला तेथील धर्ममठात शिरला. तो तेथे गडी झाला. झाडलोट करी. दोघा मित्रांची भेटगाठ क्वचितच होई. परंतु ऍन्सेलमो संधी साधी, मित्राजवळ दोन शब्द बोले. निदान डोळे तरी भेटत.

आज मेरियोचे पहिले प्रवचन होते. तो चर्चमध्ये शिरला, तेथील एका कमानीखाली बाजूला ऍन्सेलमो होता. तो म्हणाला, ''मेरियो, तुझी इच्छा पुरी होत आहे. धन्य हो, मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन.''

आणि मेरियो व्यासपीठावर चढला. त्याला कोप-यांतील तो मित्र दिसत होता. प्रेमळ भक्तिभावाने पाहणारा तो मित्र. अणि मेरियोला अपार स्फूर्ती आली. फार उत्कृष्ट असे ते प्रवचन झाले. आजवर कोणी असे ऐकले नव्हते. आणि पुढे अशीच प्रवचने होऊ लागली. श्रोते संस्फूर्त होत, उचंबळत. आपल्या मित्राचे यश पाहून ऍन्सेलमोचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येत. मेरियोची कीर्ति दूरवर पसरली. त्याला दुरून बोलावणी येऊ लागली. एकदा त्याच्या वरिष्ठांनी त्याला एके ठिकाणचे आमंत्रण स्वीकारायला सांगितले. मेरियो म्हणाला, ''ऍन्सेलमो माझ्याबरोबर हवा.''

« PreviousChapter ListNext »