Bookstruck

अधिक थोर देणगी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशी वर्षे गेली. मेरियोबरोबर ऍन्सेलमो गडी म्हणून जाई. मेरियोची स्तुती जो तो गाई. आणि शेवटी तो राजाचा धर्मगुरु झाला. त्याला रहायला राजवाडा मिळाला. मोठमोठी माणसे प्रणाम करीत, त्याचा आशीर्वाद मागत. मेरियो रुबाबदार दिसे. तो आता ऍन्सेलमोकडे लक्ष देत नसे. परंतु हा प्रेमळ मित्र जरी थकला तरी सेवा करीतच होता.

आणि तो रविवार आला. बिशप मेरियो प्रवचन देऊ लागला. परंतु सभोवतालच्या परिस्थितीत काहीतरी कमी आहे असे त्याला वाटले. त्याने खाली पाहिले. नेहमीच्या जागेवर आज ऍन्सेलमो नव्हता. परंतु त्याला लाज वाटली. आपण का ऍन्सेलमोच्या अस्तित्वावर अवलंबून असे मनात येऊन तो सुंदर शब्द आठवू लागला. परंतु विचाराचे अनुसंधान राहिले नाही. शब्द सुचत ना. कसे तरी प्रवचन संपले. संपल्यावर त्याने ''ऍन्सेलमोला बोलवा,'' म्हणून आज्ञा केली. कोणी काही बोलेना. परंतु एक वृध्द धर्मसेवक शांतपणे म्हणाला, ''पंधरा मिनिटांपूर्वी तो मरण पावला.''

मेरियोचा विश्वास बसेना. त्याला धक्का बसला. तो वृध्द धर्मसेवक पुन्हा म्हणाला, ''किती तरी महिने तो आजारी होता. रोग हटत नव्हता. परंतु आपल्याला कळवून तकलीफ देण्याची त्याला इच्छा नव्हती.''

मेरियोच्या हृदयात दु:ख दाटले. दु:खापेक्षाही आपले व्यक्तिगत नुकसान झाले असे त्याला वाटले. ''मला त्याच्या खोलीत न्या,'' तो म्हणाला आणि एका लहान अंधा-या खोलीत तो आला. फाटक्या कपडयात गुंडाळलेला तो देह तेथे होता. तो बाळपणचा मित्र तेथे पडला होता. मेरियो विचारमग्न दिसला. मित्राचे हे दारिद्रय आणि स्वत:चे वैभव याचा का विचार त्याच्या मनात आला?

''येथे तो राही?'' त्याने विचारले.
''होय महाराज.''
''आणि वेळ कसा दवडी?''
''तुमची कामे करून.''
''आणखी काय करी?''
''कामे करून फार थोडा वेळ उरे. परंतु रोज बागेत जाई. आपल्या भाकरीतून पाखरांना देई. आणि लहान मुलांजवळ बोले. आणि प्रार्थना करी.''

« PreviousChapter ListNext »