Bookstruck

मनोगत

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नमस्कार सृजनहो,

तरूण विचारांचे त्रैमासिक ही टॅगलाईन घेऊन नवसाहित्यिकांसाठीचे एक मुक्त व्यासपीठ 'आरंभ' या नावाने गेली तीन वर्षे आपले पाय घट्ट रोवून दिमाखात उभे आहे. या आरंभ परिवाराची मी एक सदस्य आहे, याचा मला सार्थ अभिमान आहेच.

आरंभ त्रैमासिक, बुकस्ट्रक आणि अर्थ मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन विशेष लेखन स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या लेखनस्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाबद्दल सर्व सहभागी स्पर्धकांचे मी सर्व आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानते आणि अभिनंदनही करते.

या स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मला दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार.

या स्पर्धेला लाभलेला प्रतिसाद पाहता मला इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, असा निराशाजनक सूर ऐकायला मिळतो आहे. या नकारात्मक विचाराला छेद देत स्पर्धक संपूर्ण तयारीनिशी या स्पर्धेत सहभागी झाले. आजही वाचन संस्कृती टिकून आहे आणि वाचनाचे माध्यम जरी बदलले तरी आम्ही वाचत राहणारच, असा सकारात्मक विचार या स्पर्धेत दिसून आला. निकोप सांस्कृतिक अभिसरणाचे हे द्योतक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली त्याबद्दल सर्व उत्साही, अभ्यासू तरूण आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

खरंतर या स्पर्धेचे परीक्षण करणे हे अत्यंत कठीण काम होते. एकाहून एक सरस असे लेख वाचायला मिळाले. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील आणि सर्व शैक्षणिक, वैचारिक गटातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

या स्पर्धेसाठी तीन  विषय  देण्यात आले होते.
१.अंतरंगात डोकावताना, २.जागतिक सुटी, ३. लॉकडाऊन संदर्भात ऐच्छिक विषय.

सद्यपरिस्थितीशी संबंधित विषय होते.. शब्दमर्यादा दिलेली नव्हती आणि लेखनासाठी  कालावधीही पुरेसा होता. म्हणजेच स्पर्धकांना पोषक वातावरण होते.

अनेक लेखांनी अवर्णनीय वाचनानंद दिला तो  भाषासौंदर्य, सर्वांग सुंदर मांडणी  आणि एकाच विषयाचे अनेक कंगोरे उलगडून वाचकांसमोर मांडण्याच्या लेखकांच्या लेखनसामर्थ्यामुळे.

परंतु काही लेखांनी अगदीच निराशा केली. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेचे नियम समजावून घेणे अत्यावश्यक गोष्ट आहे.  पण याचा अभाव अनेक लेखांमध्ये आढळला. विषयबाह्य लेखही आले. ते मात्र नाईलाजाने स्पर्धेतून वगळावे लागले. एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे लेख आणि कविता स्पर्धेतून वगळावे लागले तेही आरंभच्या अंकात प्रकाशित करण्यात येतीलच. केवळ ते स्पर्धेसाठी ग्राह्य धरले गेले नाहीत, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
आणखी एक ज्वलंत मुद्दा मांडल्याखेरीज मला पुढे जाता येणार नाही..तो म्हणजे शुद्धलेखनाचा.

बरेच लेख व्याकरणदृष्ट्या  शुद्ध आहेत. अगदी एकही शुद्धलेखनाची चूक नाही असे.. परंतु काही लेखांमध्ये शुद्धलेखन या महत्त्वाच्या मुद्दयाचा विचारच केला नव्हता असे वाटले.

नवीन तंत्रज्ञान स्विकारून ( टायपिंग, पीडीएफ बनवणे आणि मेल करणे) स्पर्धेत सहभागी होणे हेच खरंतर स्पर्धा जिंकणे होय.
पण मी लेखकांना नम्र विनंती करेन की प्रत्येकाने आपले. लिखाण व्याकरणदृष्ट्या अचूक आहे याची खात्री जरूर करून घ्यावी. मग ते स्पर्धेसाठी असो अथवा नसो.

या स्पर्धेत माझ्यासह  आशिष कर्ले, वंदना मत्रे आणि मैत्रेयी पंडीत यांनीही आपली परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
आम्ही केलेले गुणांकन  विजेत्या लेखकांना प्रोत्साहन  देणारे ठरेल तसेच ज्यांना बक्षीस मिळाले नाही अशा लेखकांनाही पुनःपुन्हा लिहण्यास प्रवृत्त करणारे ठरेल, असे मला वाटते.

बक्षीस मिळाले नाही याचा अर्थ लिखाण चांगले नाही,  असा मुळीच नाही..तर अशा लेखकांनी आपला अभ्यास वाढवावा..आपल्या उणीवा जाणून घेऊन पुढील लिखाणात त्या भरून काढाव्यात असाच  याचा अर्थ .

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची आपली सारी धडपड ही वाचण्यासाठी  चालू आहे. तरीही वाचता वाचता  थोडं वाचू या..
कदाचित वाचण्यामुळे आपण वाचूही.. आणि हो...वाचता वाचता वाचू या ही आणि लिहू या ही...

तेव्हा..अधिकाधिक वाचा...व्यक्त व्हा आणि लिहीत रहा..या संदेशासह आपला निरोप घेते.
सर्वांना लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा.

सर्वे सन्तु निरामयः|  

इति लेखनसीमा
सविता कारंजकर

« PreviousChapter ListNext »