Bookstruck

४३. वादळ शांत!

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 

खंडाळ्याला घाटात सिग्नल नव्हतं म्हणून एका ट्रेनला थांबावं लागलं. खिडकीतून लहान मुलांना झुडुपांवर माकडं दिसत होती. खाली खोल दरी होती. एका लहान मुलीने आपल्या हातातले केळ देण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तिच्या वडिलांनी तिला रागावून थांबवलं.

"ए हात बाहेर नको काढूस! दुरून फेक केळ त्याच्याकडे!"

"ठीक आहे पप्पा!"

तिने माकडांच्या समूहाकडे केळ फेकलं. माकडांनी ते झेलले आणि खाऊ लागले. त्या मुलीला ती गंमत आवडली. तिने स्वतःन खाता आपल्याजवळचे सगळी केळी त्यांच्याकडे फेकली.

एक केळ अचानक माकडाच्या हातातून हवेत ओढले गेले आणि दरीच्या दिशेने उडत निघाले. माकड बावचळले. दुसरे केळ पण आपोआप दरीकडे जायला लागले. माकडांची त्रेधातिरपीट उडालेली पाहून ती मुलगी टाळ्या वाजवून हसू लागली.

"पप्पा बघा ना! सगळी केळ आपोआप उडून गेली!"

पप्पा पेपर वाचत होते.

"काहीही काय? केळ कसे उडतील?"

तेवढयात त्यापैकी एक माकड हवेत आपोआप उडून खाली दरीकडे ओढले गेले.

ती मुलगी टाळ्या वाजवू लागली.

"पप्पा, पप्पा ते माकड उडायला लागलंय!"

"काहीही काय गं? माकड कशाला उडेल?"

सगळी माकडं दरीकडे आपोआप ओढली गेली. मग पप्पांच्या हातातला पेपर, जेवणाचा डबा, बॅग सगळ्या गोष्टी खिडकीतून बाहेर उडायला लागल्या. ज्या खिडकीच्या गजातून बाहेर निघू शकत नव्हत्या त्या वस्तू खिडकीला चिकटून राहिल्या आणि जणू बाहेर जायला धडपडू लागल्या. नंतर ती मुलगी उडून खिडकीला चिकटली, पप्पा, त्यांच्या मागे डब्यातील सगळे लोक, बॅग या माकड उडाले त्या दिशेला ओढल्या जाऊ लागल्या.

 

दरवाजा उघडा असल्याने बरेच दरवाज्यात उभे असलेले लोक प्रचंड वेगाने दरीकडे ओढले गेले. वस्तूपण दरवाज्यातून उडाल्या. काही जण हा अजब प्रकार शुटींग करून न्यूज चॅनलला पाठवू लागले, मित्रांना व्हाट्सएपवर  पाठवू लागले, नातेवाईकांना फोनवरून सांगू लागले. आणि नंतर तेही शक्य झाले नाही कारण सगळे मोबाईल, वस्तू, मोबाईल धारक व्यक्ती पण ट्रेन मधून दरीकडे ओढले जाऊ लागले. सगळ्या डब्यात आरडाओरडा आणि हलकल्लोळ माजला. ट्रेनच्या चालकाला पण समजत नव्हते काय झाले ते आणि डब्यातील लोखंडी हॅंडलला घट्ट धरूनसुद्धा तोही पकड सुटून हवेत उडून दरीत ओढला गेला. मग संपूर्ण ट्रेन रुळांवरून हवेत उचलली गेली आणि दरीकडे ओढली जाऊ लागली.

 

हायवेवर असलेल्या कार, ट्रक, बाईक्स या रस्त्यावर धावता धावता अचानक हवेत वर उचलल्या गेल्या आणि दरीकडे ओढल्या जाऊ लागल्या. आसपास पायी फिरणारे प्राणी, माणसं तसेच जमिनीच्या थोडे वर उडणारे पक्षी हे सर्वजण पण तसेच ओढले जाऊ लागले. आसपासच्या घरांतील, बिल्डिंग मधील भांडीकुंडी, लहान मोठ्या वस्तू घरातून बाहेर निघून उडू लागल्या. काही ठिकाणी जमीन भुसभुशीत होऊन लोक जमिनीत गाडले जाऊ लागले. त्या दरीच्या आसपास हवेत उडत असलेले अनेक कीटक, पक्षी पण वेगाने दरीकडे ओढले जाऊ लागले.

 

जसे चक्रीवादळ येऊन त्यात धूळ आणि इतर वस्तू गोल गोल फिरतात तसे सगळेजण गोल फिरू लागले. ट्रेनचे डबेपण गोल फिरत डीएनए रचनेसारखे एकमेकांभोवती गुंडाळले जाऊ लागले.

ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. स्वागत टीमला कळली, न्यूज चॅनलतर्फे सगळ्या महाराष्ट्रात आणि भारतात पसरली. देश विदेशांत पोहचली.

हे सगळे जे घडत होते ते हितेन आणि रजक यांच्या एका निर्णयामुळे!!

त्याचे झाले असे की रजक आणि हितेन यांना किंवा प्रयोगशाळेतल्या इतर कुणालाही तो फॉर्म्युला पुन्हा बनवणे शक्य झाले नाही. पण रजक आणि हितेन यांच्या मनात काही वेगळेच चालले होते. फॉर्म्युला शोधला नाही तर हा आपल्याला मारणार! आणि तिथली सुरक्षा व्यवस्था एवढी मजबूत होती की तिथून बाहेर निघणे पण शक्य नव्हते. अदृष्य दरवाज्यांपैकी कोणत्याही दरवाज्यातून बाहेर निघण्याचे कंट्रोल हे फक्त व्हायरसिककडे होते. इतर दरवाजे भक्कम होते, त्यांना तोडून बाहेर पळून जाणेही शक्य नव्हते. त्यापेक्षा फॉर्म्युला शोधता शोधता त्यांनी असे ठरवले होते की आता व्हायरसिकला कसेही करून अवकाशात जाऊ द्यायचे नाही. याला अद्दल घडवायची! काहीही झाले तरी चालेल! कारण फॉर्म्युला पुन्हा बनवण्यासाठी गेल्या अर्ध्या तासात व्हायरसिकने त्या दोघांचा खूप छळ केला होता.

 

अवकाशात प्रतिसृष्टीकडे प्रस्थान केल्यावर ज्या यंत्राच्या आधारे "बिग कोलॅप्स निगेटिव्ह कण" व्हायरसिक रिमोटने सुरू करणार होता, त्या यंत्राचे रिमोट कंट्रोल व्हायरसिकने कुठे ठेवले आहे ते त्यांनी हेरले. मग प्रयोग करता करता एक इलेक्ट्रॉनिक आयसी त्यांनी मुद्दाम जास्त करंट सोडून जाळली. पण युक्ती अशी केली की, प्रयोग करता करता अनावधानाने झालेली ती एक चूक वाटली, एक योगायोग वाटला.

आणि मग -

"बॉस, हा फॉर्म्युला सक्सेस होण्यासाठी ह्या आयसी शिवाय गत्यंतर नाही! पण आयसी तर जळाली!"

"जळाली का तुम्ही जाळली?"

"नाही बॉस, जळाली, हे सगळे सायंटिस्ट साक्षी आहेत!"

सायंटिस्टनी माना डोलावल्या. दुजोरा देणे भाग होते कारण त्यांनाही काही तो फॉर्म्युला बनवता येत नव्हता. हितेन रजक वर सगळ्या आशा केंद्रित होत्या.

"मग आता?"

"त्या "बिग कोलॅप्स निगेटिव्ह कण" सोडणाऱ्या यंत्राचे रिमोट आहे ना त्यात अशीच एक आयसी आहे! असे आम्हाला या सायंटिस्टने सांगितले! ते रिमोट आम्हाला द्या!!"

तो सायंटिस्ट हो म्हणाला. त्याला दोघांनी आधीच विश्वासात घेतले होते आणि त्यांच्या प्लॅन मध्ये सामील करून घेतले होते.

"ठीक आहे! घ्या, पण काही गडबड नकोय मला!"

"बॉस, आम्ही रिमोट कशाला चालू करू? आम्हाला आमचा जीव प्यारा आहे!"

रिमोट हातात मिळताच क्षणाचाही वेळ न दवडता हितेनने बटण दाबून यंत्र सुरू केले. बिग कोलॅप्स निगेटिव्ह कण जमिनीत गाडलेल्या एका टॉवरसारख्या दिसणाऱ्या यंत्रातून बाहेर पडू लागले. सृष्टी नष्ट होतांना आणि वस्तुमानाचे पुन्हा ऊर्जेत रुपांतर होतांना जसे होते तसे प्रचंड शक्तीचे चुंबकीय क्षेत्र तयार होऊ लागले. तिथले सगळे केमिकल्स, कंट्रोल पॅनेल्स, बटणे, लॅपटॉप, स्क्रीन्स, रोबोट्स, खोलीत कोंडलेली माणसं हवेत उडाली.  विजेच्या तारा, कनेक्शन वायर्स तुटल्या. स्क्रीन्स बंद पडल्या. जिकडे तिकडे शॉर्ट सर्किट झाले. बरीच विजेची उपकरणे जळाली. बऱ्याच जणांचे मास्क चेहऱ्यावरून निघून पडले. पासवर्डनचा मास्क गळून पडला. तो दुसरा तिसरा कुणी नसून हाराकू नाकामुरा होता. रोबोट्सचे नियंत्रण ठेवणारे ताकामीशी मांजर पण गुहेत अधांतरी उडत उडत गोल फिरुन म्यांव म्यांव करत ओरडायला लागले. यंत्र चालू करणारे ते रिमोट पण उडून गेले आणि आजूबाजूला भिंतींवर आदळून तुकडे होऊन नष्ट झाले. पण ते टॉवर मात्र जमिनीत गाडले असल्याने नष्ट न होता निगेटिव्ह मॅग्नेटिक पार्टीकल सोडतच राहिले.

 

तिथे ब्लॅक होल तयार व्हायला सुरुवात झाली. सगळ्या वस्तू त्या ठिकाणी खाली जमीन भुसभुशीत होवून तिथे ओढल्या जाऊ लागल्या. जसे पाण्यात दगड टाकल्यावर वर्तुळाकार तरंग दूर पसरत जातात तसेच हळूहळू त्या चुंबकीय क्षेत्राची व्याप्ती वर्तुळाकार क्षेत्रात वाढू लागली. म्हणून आजूबाजूच्या सजीव निर्जीव वस्तू ओढल्या जाऊ लागल्या. म्हणून ट्रेन आणि कार, ट्रक ओढले जाऊन वावटळीसारखे गर्रर्र गर्रर्र फिरू लागले. एक प्रचंड मोठे चुंबकीय वादळ तयार झाले होते. गुहेच्या मध्ये आणि वर ते वादळ गोल गोल फिरत होते आणि सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींना वेगाने गोल फिरवत होते. एखादा लहान मुलांचा खेळण्याचा भोवरा जसा फिरतो तसेच ते वाटत होते. तो भोवरा लवकरच आणखी तीव्र चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यावर जमिनीला छिद्र करत करत आपल्यात अडकलेल्या सगळ्या गोष्टी जमिनीत अज्ञात पोकळी निर्माण करून त्यात घेऊन जाऊन नष्ट करून टाकणार होता. सगळेकाही ऊर्जेत रुपांतरीत होणार होते.

 

सगळ्यांचा जणू काळोखाकडे प्रवास सुरु झाला होता. नकारात्मकतेकडे प्रवास सुरु झाला होता. पण डिटेक्टिव्ह निगेटिव्ह कदापिही हे होऊ देणार नव्हता कारण त्याची दृष्टी परत आलेली होती आणि त्याने हे दृश्य पाहिले होते आणि तो वेगाने अँटिक्लिपवर बसून त्या गुहेकडे येऊ लागला होता....

 

या चुंबकीय नकारात्मक वादळाबद्दल सुनिलने स्फटिकाला स्पर्श करून रंगिनीला विचारले तेव्हा तिने सांगितले की, "तुझ्यात आतापर्यंत विविध लोकांची एकवटलेली निगेटिव्ह एनर्जी वापरण्याची वेळ आली आहे!"

 

आणि तिने पूर्वी दोघांचा झालेला संवाद त्याला आठवायला सांगितले....

दूरदर्शन शक्ती मिळायच्या आधी झालेला तो संवाद सुनिलला आठवला....

 

त्या दिवशी स्फटिकाकडे बघत सुनिल पुलावर कठड्याला हात टेकून उभा राहून विचार करू लागला होता:

"अशा किती नकारात्मक घटनांचा साक्षीदार मला बनावं लागणार? ही नकारात्मकतेची डिटेक्टिव्हगिरी मला स्वतःलाच एक निगेटिव्ह माणूस तर बनवणार नाही ना? या सगळ्यांचा माझ्या मनावर नकळत एक ताण येत चालला आहे. बरेचदा रात्री झोप येत नाही! माझ्या ज्ञानाचा आणि विशिष्ट शक्तीचा उपयोग मला समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी करता येतोय याचा आनंद आहे पण..."

"पण चिंता करू नको"

"कोण?"

"विसरलास? मी रंगिनी!"

"मला मार्गदर्शन कर रंगिनी, मला कधी कधी भीती वाटते या सगळ्यांची!"

"भीती? काढून टाक! मनात शंका ठेऊ नको आणि आता माझे ऐक. आता तुझ्या मनातली भीती काढायला मी आलेली नाही. ते काम तुला स्वतःला करायचं आहे. इतरांच्या मनातील नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक विचारांत रूपांतर करणारा तू, स्वतःच नकारात्मकतेकडे झुकत चालला आहेस?"

"तसं होतंय खरं! आणि माझ्या मनात निगेटिव्ह विचार सुरू असतांना मी स्वतःला आरश्यात पाहिलं तरी मला माझ्या डोक्याभोवती लाल वर्तुळ दिसत नाही!"

"अर्थातच दिसणार नाही कारण अदृश्य किरणं आरसा डिटेक्ट करू शकत नाही. स्वतःचे निगेटिव्ह वर्तुळ बघायची तुला गरजच काय?"

"मला माहीत आहे, तशी गरज नाही कारण मला स्वतःला माहित असेल की मी काय विचार करतोय ते पण तरीही समजा बघायचे तर?"

"असे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुझाच क्लोन तुझ्यापासून वेगळा होऊन तुला तुझ्या समोरून बघेल!"

"होय खरं आहे. ते जाऊ दे. मला सांग मी असा इतरांच्या नकारात्मक लहरींचा माझ्यावर नकारात्मक परिणाम होण्यापासून स्वतःला कसा वाचवू?"

"त्याकडे तटस्थपणे बघायला शिक! असाच तुझा काल्पनिक क्लोन तयार कर जो या सगळ्यांपासून मनाने, भावनेने आणि बुद्धीने निराळा असेल, तटस्थ असेल. जमेल हळूहळू तुला! तो क्लोन हवेतून तुला कुठेतरी बघेल, तो क्लोन तू असशील आणि खऱ्या सुनिलकडे तो एक वेगळी व्यक्ती म्हणून बघेल!"

 

....हा संवाद आठवला तेव्हा सुनिल म्हणाला, "म्हणजे, मी माझ्यात आतापर्यंत साठलेल्या नकारात्मक ऊर्जेचा एक क्लोन बनवून त्या चुंबकीय वादळाला थांबवू का?"

"होय, तिथे जा आणि लहानपणापासून आतापर्यंत तुझा जेव्हा जेव्हा नकारात्मक शक्तींशी संबंध आला ते सगळे प्रसंग आठव. त्या लाल वर्तुळाकार लहरी आठव! मग तुझा गॉगल काढून डोळ्यांनी त्या वादळावर लक्ष केंद्रित कर. आणि सगळी निगेटिव्ह एनर्जी तुझ्या डोक्यातून निघून त्या वर्तुळाकार वादळात आतमध्ये सोड..."

 

FF1,2 आणि MF1,2 तसेच इतर फायटर्स, जलजीवा, झाड मानव यांच्यावर शहरातील जबाबदारी सोपवून डिटेक्टिव्ह हाडवैरीला मागे बसवून घेऊन गुहेकडे निघाला तेव्हा पुणे मुंबईतील बहुतेक सर्व यांत्रिक प्राण्यांची शक्ती संपून ते नष्ट होत होते कारण त्यांना कंट्रोल करणारी गुहेतली यंत्रणा पण आता नष्ट होत होती. आता आणखी नवे प्राणी येणार नव्हते. उरल्या सुरल्या मानवी प्राण्यांना मारण्यास ते सगळे समर्थ होते. मुंबईत पण सुनिलने गुहेतील वादळाबद्दल सांगितले.

 

मुंबई पुण्यात वाईट टीमला सामील झालेले जितके लोक होते त्यांचे नाव पत्ते स्वागत सुपरहिरो आणि फायटर्स यांनी मानवी प्राण्यांना पकडून विचारले आणि त्यांना स्वागत टीम मध्ये सामील होता की तुरुंगात जाता असे दोन पर्याय देण्यास सुरुवात केली.

 

आर्मी, स्वागत आणि न्यूज चॅनल्सचे हेलिकॉप्टर्स हवेतून त्या गुहेजवळच्या वादळात ओढले जाऊ नये म्हणून त्यांना तिकडे येण्यासाठी मनाई केली गेली. त्यांना शक्य तेवढे दूर जाण्यास सांगण्यात आले! तिकडे आता फक्त सुनिलचे काम होते!!

 

अँटिक्लिपवर बसून सुनिल आणि हाडवैरी जसजसे खंडाळ्याला त्या गुहेकडे जाऊ लागले तसतसे त्या वादळाचे वर्तुळाकार क्षेत्रफळ वाढून जास्त सजीव निर्जीव त्यात ओढले जात होते. कालांतराने त्या मॅग्नेटिक एनर्जीकडे अँटिक्लिपसहित सुनिलपण ओढला जाऊ लागला. पण निगेटिव्ह एनर्जी हीच निगेटिव्ह एनर्जीला तोंड देऊ शकते या हिशेबाने त्याच्यातील निगेटिव्ह एनर्जी त्या मॅग्नेटिक एनर्जीला रोखत होती.

 

 दरम्यान, सुनिलवर आणि अँटिक्लिपवर वादळात ओढल्या जात असलेल्या अनेक गोष्टी आदळायला लागल्या. सजीव गोष्टींना हाडवैरी हाताने बाजूला करत होता आणि निर्जीव वस्तूंना हॅट मधल्या शस्त्रांनी बाजूला करत करत सुनिल गुहेकडे मार्गक्रमण करत होता. काही अवजड शस्त्रे निर्माण करून सुनिल उडणाऱ्या माणसे आणि स्त्रिया मुले यांना देऊ लागला ज्याद्वारे त्यांना धरून ते कुठेतरी जमिनीत अडकवून चुंबकीय वादळात जाण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतील.

 

"सुनिल, हा अँटिक्लिप लय भारी आहे! मला पण असा एक पाहिजे", हाडवैरी म्हणाला.

"अरे, वेड्या तुझ्यातील शक्ती जागृत झाल्यावर तुझं करंट लागून पक्षी मरून जाईल! आता पण सावध राहा नाहीतर हा अँटिक्लिप बिचारा शॉक लागून मरेल!"

"नाही, सुनिल! शक्ती जागृत झाली तर त्या आधीच मी उतरून जाईन! किंवा माझ्यासाठी असाच एखादा शॉक प्रूफ प्राणी पक्षी बनवा!", हसत तो म्हणाला.

"मी कुठून बनवू? त्यापेक्षा त्या व्हायरसिकला सांग किंवा मग गुहेतील ते जपानी ताकामीशी मांजर त्याला सांग! तो बनवून देईल, आपण त्याचे अपहरण करू!"

"चांगली विनोद बुद्धी आहे सुनिल तुझी!"

 

गुहा आली. समोर वादळ घोंगावत होते. आतापर्यंत अँटिक्लिपने चार पैकी मागच्या दोन पंखाच्या वेटोळ्यात हाडवैरीला धरून ठेवलं होतं त्यामुळे तो उडाला नाही आणि सुनिलच्या निगेटिव्ह एनर्जीमुळे अँटिक्लिप पण वादळाकडे ओढला गेला नाही.

 

सुनिल हाडवैरीला म्हणाला, "तू त्या टॉवरला निकामी कर आणि मी तोपर्यंत नकारात्मक चुंबकीय ऊर्जा नष्ट करतो!"

 

सुनिल अँटिक्लिपवर बसून अंगावर आदळणाऱ्या गोष्टी झेलत हवेत एके ठिकाणी स्थिर झाला. डोळे बंद करून आकाशाकडे चेहरा करत दोन्ही हात कवायत करतो तसे शरीराला 90 टक्के कोनात आणि जमिनीला समांतर करून त्याने आतापर्यंत लहानपणापासून ज्या काही नकारात्मकतेशी सामना केला होता त्या सगळ्या गोष्टी, व्यक्ती, घटना आठवायला सुरुवात केली. स्टेशनवर आत्महत्येपासून परावृत्त केलेला मुलगा, एके ठिकाणी टाळलेला बलात्कार, मुलांची टाळलेली रॅगिंग, ज्येष्ठ नागरिकांना चोरांपासून वाचवले ते, ज्वेलरी शॉप मध्ये पकडलेला चोर, ट्राफिक पोलिसांचे वाचवलेले प्राण, दारूच्या नशेत होऊ शकणारा पण टाळलेला खून, पुलावरून छोट्या मुलीला खाली फेकण्याची घटना टाळण्यात आलेले यश, रणजित यांच्यासोबत पुलावर पकडलेला जग्गू, पोलिस स्टेशनमध्ये अचूक हेरलेले बरेच गुन्हेगार असे एक ना दोन...अशा सगळ्या घटना तो आठवू लागला, त्या घटनांतील सगळी नकारात्मक प्रखर जळती लाल वलयं तो आठवू लागला, ती जणू काही त्याच्यात आता एकवटून संचारली....

 

त्याच्या शरीराच्या आजूबाजूला एक अदृश्य नकारात्मक शक्ती वेढली गेली आणि मग सुनिलसारखाच दिसणारा त्याच्याच आकाराचा एक नकारात्मक ऊर्जेने भरलेला ऊर्जेचा लोळ त्याच्या शरीरापासून वेगळा झाला आणि सुनिलच्या विचारांनी तो नियंत्रित होऊ लागला....

 

सुनिलने त्याला त्या चक्रीवादळात पाठवले. त्यात जाऊन तो स्थिर झाला. पण त्याला त्या चुंबकीय चक्रीवादळामुळे जो प्रचंड विरोध झाला तो अनुभव इकडे सुनिललाही येऊ लागला. मग समोरच्या सुनिलच्या नकारात्मक ऊर्जेच्या लोळामध्ये सगळी चुंबकीय शक्ती एकवटून आत शिरायला लागली. तिथे प्रचंड इलेक्ट्रिक एनर्जी तयार झाली. विजा चमकतात तास ऊर्जेचा प्रचंड खेळ तिथे दहा मिनिटे सुरू होता आणि एका क्षणी सगळं शांत झालं....

 

ओढले जाणारे सजीव निर्जीव त्याच ठिकाणी खाली जमिनीवर पडले. सुनिल आता ती निगेटिव्ह मॅग्नेटिक एनर्जी आणि इतर लोक यांच्यात एक ढाल झाला होता. आता जर ही एनर्जी गुहेच्या बाहेर थांबवली नसती तर लाखोंच्या संख्येने लोक त्यात ओढले गेले असते कारण त्याचा वेग आणि शक्ती आता खूप प्रचंड झाली होती...

सुनिलला मात्र ती एनर्जी खूप त्रास देत होती. गुहेतून प्रचंड वेग बाहेर येऊन सुनिलच्या त्या क्लोनवर आदळत होता आणि त्या क्लोन मधली निगेटिव्ह एनर्जी त्या चुंबकीय शक्तीला रोखून धरत होती. सुनिलला प्रचंड वेदना होत होत्या.

 

"हाडवैरी, ते टॉवर लवकर शोध आणि निकामी कर! जास्त काळ मी हे सहन करू शकत नाही!"

"होय सुनिल, नक्की, मला सापडलं आहे ते टॉवर!"

 

इकडे हाडवैरीने गुहेतील मॅग्नेटिक एनर्जीमुळे तुटून वेगळे झालेल्या गुहेच्या एका दरवाज्यातून गुहेच्या आत प्रवेश केला आणि वेगाने एका अनंत काळोखी वर्तुळाकार विहिरीसारख्या भागात ओढला जाऊ लागला पण त्याने पटकन स्वतःला सावरले आणि एका जमिनीत भक्कम गाडल्या गेलेल्या लोखंडी खांबात आपला पाय अडकवून ठेवला. त्या मॅग्नेटिक एनर्जीला विरोध करून एका जागी स्थिर राहणे सोपे नव्हते. बऱ्याच गुलाम लोकांना त्याने ढकलून ढकलून एका गजाच्या भिंतीवर फेकले. तिथे त्यांनी गज धरून ठेवले. त्या टॉवरचा गुहेत अर्धा भाग होता आणि गुहेच्यावर अर्धा भाग होता. एका हाताने ते टॉवर गदागदा हलवून त्याने ते कडा कडा मोडून काढले. त्यातल्या इलेक्ट्रिसिटीचा हाडवैरीवर काहीच परिणाम झाला नाही. मग त्याने गुहेतील टॉवरचा भाग मुळापासून उखडून काढला आणि त्या विहिरीत भिरकावून दिला. ताकामीशी मांजर उडत उडत गोल गोल फिरत त्या अनंत विहिरीकडे जातांना त्याला दिसले, त्याने क्षणाकरता आपला पाय सोडला आणि मांजराला झेप घेऊन पकडलं पण त्यामुळे तो अनंत काळोख्या विहिरीकडे ओढला जाऊ लागला. पण वेगाने झेप घेऊन पुन्हा एकदा लोखंडी खांबाला त्याने एका हाताने धरले. आता त्या चुंबकीय वादळाचा प्रभाव कमी होत होता. आणि मग अचानक तिथला अनंत विहिरीचा काळा गोल भाग नष्ट झाला आणि तिथे साधी जमीन दिसायला लागली. तोपर्यंत अनेक सजीव निर्जीव गोष्टी त्याच्या आतमध्ये जाऊन गडप झाल्या होत्या.

 

ब्लॅक होलचा प्रभाव संपला होता. हाडवैरी गुहेतील सगळ्याच गुलाम माणसांना वाचवू शकला नाही पण बऱ्याच लोकांना त्याने पकडून गुहेच्या वर फेकले. मग शेवटी ताकामीशी मांजराला हातात पकडून तो गुहेबाहेर आला.

जमिनीवर त्या गुहेच्या जागी प्रचंड मोठा खड्डा पडला होता जणू काही तिथे आकाशातून येऊन एखादी उल्का आदळली आहे!

तो सुनिलच्या आकाराचा निगेटिव्हीटीचा लोळ गुहेजवळून निघून आता पुन्हा सुनिलच्या अंगात समाविष्ट झाला.

"अरे, तू माझं बोलणं अगदी सिरियसली घेतलं, खरंच आणलं त्या मांजराला!", सुनिल जिंकल्याच्या अतीव आनंदाने म्हणाला.

"मग बॉस, आपलं कामच तसं आहे! हे दिसतं गरीब मांजर पण सगळे फॉर्म्युले याला माहीत आहेत. सुजित लहानेचा हवेपासून पेट्रोल आणि पाणी बनवण्याचा फॉर्म्युला पण याला माहिती आहे", हाडवैरी त्या ताकामीशी मांजराला कुरवाळत म्हणाला.

मांजर छद्मीपणाने खुदकन हसलं.

"ओके, पण विशाल, आता हे ब्लॅक होल जरी बंद झालंय तरीही आतापर्यंत त्यात ओढल्या गेलेल्या सजीव निर्जीव गोष्टी त्या ब्लॅक होलच्या दुसऱ्या टोकाला कुठेतरी फेकल्या गेल्या असतील!! मग ते दुसरे टोक पृथ्वीवरच दुसऱ्या एखाद्या देशात असेल की अवकाशात इतर कुठे दुसरीकडे ते सांगता येणार नाही!"

थोड्याच वेळात सगळीकडे ही बातमी पसरली. सुनिलने पुण्या मुंबईत स्वागत मेंबर्स आणि इतर सगळ्यांना धोका टळल्याचे सांगितले.

तिकडे मुंबईतील प्रयोगशाळेत स्मृतिका सायलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. त्या कार्यालाही यश येत होतं.

इसरोने इकडे आनंदाची बातमी दिली होती. वाईट टीमने तयार केलेली आकाशातील प्रतिसृष्टी नष्ट करण्यात त्यांना नासाच्या मदतीने यश आलं होतं.

सगळीकडे स्वागत टीम, भारतीय लष्कर आणि त्यांच्या या चार अनोख्या सुपरहिरोंची वाहवा होत होती. सुपर नेचर बेटावर तर ही बातमी कळली तेव्हा अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जगासाठी चारही सुपरहिरोंचे चेहरे वेगळे दिसत होते (मास्क नुसार) आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी त्यांचे चेहरे मूळचे म्हणजे ओरिजिनल होते.

रणजित, नेत्रा आणि सुजित लहाने यांना आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी यासाठी बलिदान दिले त्यांना ही खरी श्रद्धांजली होती.

आता दुपारचे तीन वाजले होते!

न्यूज चॅनल वाल्यांचे ब्रेकिंग न्यूज सगळीकडे फटाफट ब्रेक होत होते. सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता.

विशेष म्हणजे किशोर आणि अनघा यांनी आठ दिवसानंतरची लग्नाची तारीख ठरवून टाकली!

जगभर वाईट टीम मुळे अर्धवट नष्ट झालेल्या काही महत्त्वाच्या वास्तू मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाची आणि विज्ञानाच्या केलेला दुरूपयोगाची साक्ष देत होत्या आणि मानवाला आता सुधारण्यासाठी जणू विनंती करत होत्या. सुपर नेचर बेटावरच्या डॉक्टर शिशिर यांच्या सांगण्यानुसार आता स्वागत टीम आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि एकूणच विज्ञान, निसर्ग, तंत्रज्ञान, मानवता यांचा समतोल कसा साधता येईल यासाठी जगभर प्रबोधन आणि जागृती करणार होते तसेच यापैकी कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही हे आता बघणार होते. त्या नष्ट झालेल्या वास्तू आता पुन्हा तयार कराव्या लागणार होत्या.

सुनिल विशालला म्हणला, “हाडवैरी मित्रा, तुझी आणि निशाची कथा मला ऐकायची आहे फावल्या वेळात! सांगशील ना!”

विशाल म्हणाला, “नक्की, आपण चौघे सुपर नेचर बेटावरच्या ट्री हाऊस मध्ये बसून एकदा भरपूर गप्पा मारू! तेव्हा नक्की कथा ऐकवेन!”

(समाप्त)

 

एके ठिकाणी -

निद्राजीताचा प्रियकर सूर्यविराट मुक्त झाला आणि सूर्याकडे बघून त्याने छातीवर दोन्ही हात आपटत एक मोठी आरोळी ठोकली आणि तो एका दिशेला चालू लागला, तिथे एकजण आधीपासूनच त्याची वाट बघत होता...

 

(सूचना: याच लेखकाची जलजीवांवर आधारित "जलजीवा" नावाची स्वतंत्र कादंबरी आधीच प्रकाशित झालेली आहे. जलजीवांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर ती तुम्ही वाचू शकता!)

 

« PreviousChapter ListNext »