Bookstruck

समाजधर्म 37

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भारताचा इतिहास! कोणी लिहिला आहे भारताचा इतिहास? भारताचा इतिहास अजून लिहिला गेला नाही. तो लिहिला गेला पाहिजे. हल्ली विशेषत: जे इंग्रजीत हिंदुस्थानचे म्हणून इतिहास लिहिले जातात त्या इतिहासांना प्लासीचे लढाई व वॉरन हेस्टिंग्ज यांच्यापासून सुरूवात केलेली असते! त्यापूर्वीचा दोन चार हजार वर्षांचा इतिहास दहावीस पानात देऊन हे पठ्ठे मोकळे होतात. त्यांना हा पूर्वेतिहास म्हणजे अडगळच जणू वाटते, सारा केरकचरा वाटतो. अगदीच सोडता येत नाही म्हणून आरंभी देतात थोडी हकीकत. या विशाल राष्ट्राचा असा इतिहास लिहिणे म्हणजे निव्वळ थट्टा आहे. हे सारे इतिहास गचाळ व रद्दी समजून, फाडून, तोडून, फेकून दिले पाहिजेत. जाळून धुळीत मिळविले पाहिजेत. असले इतिहास भारतीय मुलांच्या हातात पडणे म्हणजे पाप आहे. भारताच्या इतिहासात भावना ओताव्या लागतील; मानवजातीचे हृदय शोधावे लागेल. आजच्या भारतीय संतजनांना तो इतिहास स्फूर्तिप्रद, पेटवणारा व चेतविणारा, नव महाकार्यास उठविणारा असा वाटला पाहिजे. भारताचा इतिहास म्हणजे फुंकलेले रणशिंग असा वाटला पाहिजे, असा वठला पाहिजे. असा हा इतिहास लिहिण्यासाठी प्राचीनकाळची स्थळे शोधून काढली पाहिजेत. त्या स्थळांवर दृष्टी खिळविली पाहिजे, आत्मा रमवला पाहिजे. कलकत्ता, मुंबई, मद्रास ही हिंदुस्थानच्या इतिहासातील मुख्य केंद्रे म्हणून आज मुलांना दाखविण्यात येतात! आपले ते थोर पूर्वज हे दृश्य पाहून वर रडत नसले तर निदान हसत तरी असतील. असे कसे हे आपले पोर नादान, शेळपट व नेभळट असे त्यांना वाटत असेल. भारताचा इतिहास म्हणजे का या मासेमार्‍या बकाली शहरांचा इतिहास? ठाणेश्वर व कुंभेरी, हळदीघाट व पानिपत, सिंहगड व पावनखिंड कोठे गेली? ज्या पूर्वजांनी ह्या रणक्षेत्रावर धारातीर्थी देह ठेवले, त्याचप्रमाणे ज्या पूर्वजांनी नवीन विशाल नगरे वसविली, प्रचंड भिंती व प्राकार बांधले, खंदक खणले, तसेच ज्या ऋषींनी व शास्त्रज्ञांनी विचार, शास्त्रे, सुंदर लिपी भावी पिढीसाठी ठेवून दिली, त्यांनी कलांचा परम पूज्यतेने विकास केला, ज्यांनी प्रचंड गोपुरे व भव्य मंदिरे उभारली ज्यांनी अपूर्व लेणी व गुंफा खांदवली, ज्यांनी अतुलनीय व धीरोदात्त अशी महाकाव्ये जगाला दिली व थोर जीवनाचे आदर्श दिले, असे ते सारे थोर पूर्वज त्यांचे नावही ह्या इतिहासातून आढळत नाही. असले भिकार व आत्मघातकी इतिहास हे आपल्या मुलाबाळांच्या हातात देतात तरी कसे, असे ते पूर्वज वरती म्हणत असतील. त्या पूर्वजांच्या मनाची काय स्थिती होत असेल, त्यांचे अंत:करण कसे जळत असेल, हदय कसे रडत असेल, याची कल्पना तरी तुम्हाला येते का?

कमीत कमी तीन हजार वर्षांचे थर उकरून भारताचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. ही कालची परवाची मुंबई-मद्रास शहरे बघून भागणार नाही. कधी नद्यांच्या तीरावर तर कधी समुद्रकाठी, कधी नैमिषारण्यात तर कधी दंडकारण्यात, कधी हिमालयाच्या पायथ्याशी तर कधी विंध्याद्रीच्या कुशीत; कधी दर्‍या खोर्‍यात तर कधी पर्वताच्या माथ्यावर, कधी अजिंठ्याजवळ तर कधी सांचीच्या शेजारी याप्रमाणे भारताचा इतिहास घडलेला आहे.  प्रत्येक ठिकाणी थर पडलेले आहेत, खाणाखुणा आहेत. निरनिराळ्या काळात निरनिराळ्या ठिकाणी कर्मक्षेत्र होते, शक्तीकेन्द्रे होती, अयोध्या आणि हस्तिनापूर, द्वारका आणि मथुरा, गया आणि काशी, इंद्रप्रस्थ आणि पाटलिपुत्र, उज्जयनी आणि दिल्ली, कांचीवरम् आणि अमरावती, भागानगर आणि प्रतिष्ठान-त्या त्या काळात ती ती पुरेपट्टणे चमकली, शोभली. ती  काळ, ती सृष्टी कोठे आहे? ती अदृश्य जगे कोण शोधणार? कोण उकरणार? कालोदरणातून कोण वर काढणार?

पूजेशिवाय देव नाही. भारतामातेच्या पुत्रांनो! आपल्या उज्ज्वल व दिव्य भूतकाळाची पूजा करावयास चला. अयोध्या व मथुरा, नालंदा व तक्षशिला, अजिंठा व वेरूळ पूजावयास चला. पेटलेल्या व भावनोत्कट मनाने उठा. भूतकाळाचे संपुर्ण, सांगोपाग व सविस्तर ज्ञान मिळविण्यासाठी वेडे व्हा. ज्ञानासाठी बाळ नचिकेत मृत्युदेवाजवळ गेला. सत्यासाठी सावित्री यमापाठोपाठ गेली. ज्ञानासाठी अगणित श्रम करावयास आनंदाने उठा.  ज्ञानासाठी जीवने द्या. हा जुना इतिहास तुमचा तुम्हीच संशोधिला पाहिजे. गोळा केला पाहिजे. टिकम्, पिकम्, कुदळी, खणती हातात घ्या; फावडी पहारी हातात घ्या. सारी जुनी नगरे पुन्हा वर आणा. खोल संशोधन करा; खर्‍या गोष्टी शोधून काढा; कंटाळा करू नका. कारण यातच भारताची आशा आहे. ज्याला उज्जवल भूत आहे त्याचा भविष्य उज्ज्वलतर असणार! म्हणून सत्य काय ते शोधून काढा. सत्यासाठी भारतवर्षाला कधी औदासिन्य व कंटाळा वाटला नाही. सत्यपूजेसाठी भारत प्रसिध्द आहे; सत्यासाठी त्याला जितका आदर, उल्हास व उत्साह आहे, तसा अन्य कशाबद्दलही नाही. सत्याकडे भारताचे हृदय ओढले जात असे. त्यासाठी त्याचे प्राण तडफडत, त्याची कालवाकालव होई. सत्याशोधन हेच भारताचे ध्येय होते.

« PreviousChapter ListNext »