Bookstruck

समाजधर्म 38

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इतिहास संशोधनाप्रमाणे इतरही भरपूर कामे आहेत. प्रत्येक प्रांतिक भाषेत थोर व महनीय साहित्य निर्माण झाले पाहिजे. या साहित्यात भूतकाळाचा सिंहनाद पाहिजे व भविष्यकाळासंबंधीची दिशा दाखविण्यात आली पाहिजे. देशी भाषेतून युरोपियन शास्त्रे, युरोपियन कल्पना व विचार विशदपणे व सुबोधपणे प्रकट करण्यात आले पाहिजेत. हे विचार घरोघर गेले पाहिजेत. परकीयांच्या संस्थाचे अनुकरण करून चालणार नाही. परंतु त्यांच्या विचारांच्या बाबतीत उदासीन व बेफिकीरही राहून चालणार नाही. त्यांच्या ध्येयांचा व गुणांचा विचार आपण केलाच पाहिजे. भारतीय भूतकाळचा इतिहासही लोकांना समजेल अशा रीतीने लिहिला गेला पाहिजे. जशी राष्ट्राची सामुदायिक प्रार्थना, जसे वंदे मातरम्  गीत सर्वांच्या ओठावर, त्याचप्रमाणे राष्ट्रा बद्दलची आशा सर्व जनांच्या; हृदयात उत्पन्न केली पाहिजे व हे वाङ्मयाचे काम आहे. तसेच मुले-बाळे, स्त्रिया या सर्वांना समजेन अशा रीतीने आपला इतिहास, पाश्चात्य शास्त्रे ही घेण्यासाठी वाङमय-सेवकांची जरूर आहे.  देशी भाषेत जेव्हा अशा प्रकारची साहित्ये तयार होतील, तेव्हाच स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल. तेव्हाच खरे परिणामकारक शिक्षण घेता येईल. 

कलेचेही पुनरुज्जीवन करावयाचे आहे. आज भारतीय कलावान युरोपातील कलांचे जे अर्धवट; लज्जास्पद अनुकारण करीत आहेत, ते सारे सोडून दिले पाहिजे.  कलेची हाक लोकांच्या हदयाला लौकरच पोहोचते.  कला ही पटकन समजणारी भाषा आहे. कलेचे बोलणे हदयाला जाऊन भिडते. हृदयाचा ठाव घेते. एखादे दिव्य गान एखादे उज्ज्वल चित्र संबध राष्ट्राला चैतन्य देते. नवजीवन व नवविचार देते. एखादे गीत व एखादे चित्र अनेक भिन्न जातींना एकत्र जोडील, संघटित करील. एका वंदे मातरम् या गीताने जेवढी राष्ट्रीयता निर्माण केली आहे, तेवढा शेकडो निबंध व ग्रंथ यांनी झाली नसेल. हिंदुस्थानातील कलेचे पुनरुज्जीवन होणार, हे देवच बोलून चुकला आहे. आता कलेला नवीन व अनंत विषय सापडला आहे. भारतमाता ही आता सार्‍या कलांचा विषय. कवीला, चित्रकाराला, शिल्पकाराला; भारतमाता हा कधी न संपणारा, अगाध व अपार विषय मिळाला आहे. हा विषय कधी जुना होणार नाही. येथे विविधरूपदर्शन आहे. हजारो गोष्टी येथे कलावंताला दिसतील. ना धड अंगावर कपडे असा झोक्यावर झोके घेणारा भिल्लाचा मुलगा, प्रात:काळी समुद्रतीरी जाऊन स्नान करणारी पवित्र नारी, सायंकाळी तुळशीला दिवा दाखवणारी स्त्री, देवळात पुराण सांगणारा पुराणिक, संतांचे अभंग म्हणणारा भिकारी, नागाला पुंगी वाजवून डोलावणारा गारूडी, रानात गायी चारणारा, पावा वाजविणारा गायीच्या पाठीवर बसणारा गोपाळबाळ, वासरांना चाटणार्‍या गायी, गायीला कुरवाळणारा शेतकरी, नांगराचे उमेद व गंभीर बैल, सुंदर सूर्यास्त, घनदाट वने, पवित्र सरित्तीरे, नद्यांचे घाट, घाटावरची गर्दी, मंदिरे, मुलांचे खेळ, हमामा व हुतुतु, प्रचंड पर्वत, इतिहासप्रसिध्द किल्ले, थोर थोर ऐतिहासिक प्रसंग; एक का दोन, शेकडो विषय भारतीय कलेला आहेत. कलावंताचे डोळे उघडे पाहिजेत व त्या डोळ्यात हृदय येऊन बसले पाहिजे. म्हणजे त्याला विषयांची वाण कधीच पडणार नाही.

« PreviousChapter ListNext »