Bookstruck

इस्लामी संस्कृति 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्रिखंडाशीं संबंधित अरब भूमि

मध्य अरबस्थानांतील अरबांपेक्षा किना-यावचे अरब निराळे होते.  समुद्र किना-याला पाण्याचा भरपूर पुरवठा असे. पाऊस पडे. जमीन सुपीक होती. व्यापारी जीवनहि होते. दळणवळण दगदगीचें नव्हतें. वरती युफ्रातीस व तैग्रीस नद्यांच्या सुपीक भागांत संस्कृति फुलल्या. सीरिया व बाबिलोनचा तो भाग फार सुधारलेला होता. इराण व हिंदुस्थान, ईजिप्त व रोमन यांच्याशी या भागाचा संबंध असे. परंतु अरबस्थानांतील समुद्रतटवतीं प्रदेश वरील बाबिलोनी भागापेक्षांहि जरा अधिक भाग्यवान् होते. हा अरबी भाग हिंदुस्थान, इराण, आफ्रिका यांना सीरिया-बाबिलोनपक्षांहि अधिक ओढी. हा अरबी किनाराहि संस्कृतींच्या भेटीचें स्थान होता. या अरब द्वीपकल्पाचें हें भाग्य होतें. हिंदुस्थानचेहि इतकें सौभाग्य नव्हतें. हिंदुस्थान युरोपपासून विभक्त होता. चीनशींहि प्रत्यक्ष संबंध नव्हता. राजकीय अनुभवाच्या द्दष्टीनें अरबस्थानाला हिंदुस्थानपेक्षां अधिक संधि होती. लष्करी गोष्टीहि अधिक शिकायला मिळत. अरबस्थानच्या किना-यावरची संस्कृति ग्रीक, रोमन, ईजिप्शियन, इराणी व हिंदुस्थानी या सर्व संस्कृतीचे मिश्रण होती. अरबस्थान सुधारलेला नव्हता असें म्हणणें चूक आहे. किना-याचा अरबस्थान सुसंस्कृत व प्रगल्भ होता. श्रीमंत व धीमंत होता.

अरबस्थानच्या उत्तरेकडच्या भागावर कॉन्स्टँटिनोपलचा परिणाम होई. मेसापोटेमिया वगैरे भागावर इराण व रोमन साम्राज्य यांचा होई. दक्षिण अरबस्थानावर इराण व हिंदुस्थानचा होई. पश्चिम भागावर ईजिप्त, नाईल, युरोप, हिंदुस्थान यांचा होई. अरबस्थानाला अशी ही सुंदर संधि होती. सहाव्या सातव्या शतकांतील अत्यन्त सुधारलेल्या देशांशीं संबंध येण्याचें भाग्य त्यांना लाभलें होतें. हिंदुस्थान, युरोप व आफ्रिका या तिन्ही खंडांशीं अरबांचा संबंध येई व त्यामुळें न वाढणारी प्रगति वाढली. अरबांस व्यापाराची हौस होती. कारण विषम हवेमुळें शेती कठीण. कधी कडक हिवाळा, कधीं कडक उन्हाळा. कधीं वर्षानुवर्ष अवर्षण पडे. तरीहि अरब शेती करीत. मेसापोटेमियांतील बागबगीचे, मळे त्यांनी पाहिले होते. शेतींत किफायतही चांगली होई. भटक्या बेदुइनी संस्कृतीपेक्षां ही कृषिप्रधान संस्कृती निराळी असणार. कृषिप्रधान प्रदेशांत स्थिर स्वरूपाच्या संस्था उदयास येतात. समुद्रकिना-यालगतच्या प्रदेशांत नबाबशाही अस्तित्वांत आली. तेथील अरब व्यापारी बनले. हिंदुस्थान चीनपर्यंत जात. संपत्ति जमूं लागली. राजेशाहीच्या कल्पना सर्व देशांतून येथें येत. रोमन व इराणी साम्राज्यांतून कल्पना येत. परंतु अरबस्थानांतील बेदुइनच्या लोकशाहीच्या, स्वातंत्र्याच्या कल्पनाहि येत व स्फूर्ति देत. या दोन्ही विचारांचा विरोध असे. यामुळें राजेशाही कल्पनांचे घोडें फार पुढें सरकलें नाही. समुद्रकांठच्या अरबांची वृत्ति जरा नबाबी होती. सुखप्रिय व सत्ताप्रिय होती. तेथें सरदारांची, खानदानांची सत्ता होती म्हणा ना. नाहीं धड एक राजा, नाहि धड लोकशाही. वरिष्ठ वर्गाची, श्रीमंतांची सत्ता होती. गरीब बेदुइनांत लोकसत्ता होती. गरीब अरब शेती व व्यापार हे सान्मान्य धंदे मानीत नसत, लढणें व लुटणें यांना ते सन्मान्य मानीत. कारण यानें स्वातंत्र्य राहतें. समुद्रकांठचे अरबहि लढाऊ वृत्तीचे होते. कारण अन्तर्गत अरबांपासून रक्षण करणें तसेच मेसापोटेमिया, पॅलेस्टाईन, रोमन साम्राज्य या सर्वांपासून रक्षण करणे जरूर असे. व्यापार व शेती करून जी धन दौलत ते मिळवीत ती वाळवंटी अरबांनी लुटूं नये म्हणून त्यांना शस्त्रास्त्रें ठेवावी लागत. वैयक्तिक व राजकीय दोन्ही कारणांमुळे त्यांची लढाऊ वृत्ति कायम राहिली. वाळवंटी अरब व समुद्रकांठी अरब दोघेहि झुंजार होते. फरक इतकाच की, समुद्रकांठीं अधिक संस्कृति होती. अनेक देशांशीं संबंध येई. त्यामुळें नाना विचार येत. कल्पना येत. ज्ञान येई. परंतु अद्याप ज्ञानासाठीं म्हणून ज्ञानाची भक्ति नव्हती. शिकण्यासाठी म्हणून शिकणें सन्मानिलें जात नसे. लढणे हे सर्वांच्या आधीं. मग व्यापार, मग शेती. सर्वात शेवटचें स्थान शिकण्याला!

« PreviousChapter ListNext »