Bookstruck

इस्लामी संस्कृति 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ही अरब संस्कृति सर्व ठिकाणच्या संबंधांपासून जन्मली म्हणून ती लौकर वाढली. प्रगति सत्वर झाली. लोक नीट घरें दारें करून राहूं लागले. हवा फार कडक व इतरहि अडचणी त्यामुळें घरें बंद असत. शिल्पशास्त्रांत फार प्रगति म्हणून झाली नाहीं. घरांत अंधार असे. तेथील नक्षी, कला कोण पाहणार? घरें विटांची असत. घरें आंत ओलसर व दमट ठेवीत. तशी जरूर असे. अधिक दमटपणा व कमी प्रकाश हें तत्त्व असे. संगीताची बरीच प्रगति झाली होती. शेती व व्यापारानें संपत्ति वाढली होती. नाना देशांतील लोक येत व नैतिक मूल्यमापनांतहि फरक होई. संगीत म्हणजे धन्यतम कला म्हणून नसे आदरिली जात. स्वच्छंदी व विलासी जीवनाचें साधन या नात्यानें संगीताकडे बघत. संगीत म्हणजे विकारांना उत्तेजन. संगीत म्हणजे चिंता काळजी दूर फेंकून सार्वजनिक रीत्या नाचतमाशांत दंग होणे. नाना वाद्यें व नाच अस्तित्वात आले. जीवन संयमी व्हावयास धर्म नव्हता, नीतिशिक्षण नव्हतें. आजच्या पॅरिस, व्हिएन्ना वगैरे शहरांतून, न्यूयॉर्क, शांघाय वगैरे शहरांतून जे जे सुखविलास आढळतात ते सारे मक्केंत होते.!

मुहंमदापूर्वी अरब मोठे व्यापारी होते. यमनमधला माल अरबच सीरियांत नेते मुहंमदापूर्वी एक हजार वर्षे होऊन गेलेला एक ज्यू कवि अरब व्यापाराविषयीं लिहितो

''हे सीरिया, अरब व्यापारी तुझे आहेत. ते मसाले, सोने, मौल्यवान वस्तु तुला आणून देतात. कोंकरें, मेंढया, शेळया नेतात. निळें कापड नेतात. नक्षीदार कापड नेतात.''

या व्यापारी जीवनाचें केंन्द्र मक्का होतें. मक्केला सीरियांतून रेशमी व लोकरीचें कापड, गुलाबी कापड घेऊन व्यापारी येत. आणि वेलदोडे, चंदन, लवंगा, सुगंधी वस्तु, खजूर, कांतडीं, धातु वगैरे माल जो आफ्रिकेंतून व हिंदुस्थानांतून येथें येई तो सीरियाकडे घेऊन जात. मक्केंतील काबाजवळ मोठमोठया व्यापा-यांच्या बैठका ज्यांत भरत असे दिवाणखाने होते. तेथें कवि प्रेमाचा व शौर्याची गाणीं गात. ग्रीक व इराणी गुलामकन्या त्या व्यापा-यांच्या मेजवान्यांतून आपल्या देशांतील संगीतानें रंग भरीत. अद्याप अभिजात अरब संगीत जन्मलें नव्हतें. उंटांना हांकलण्याचीं गाणी हीच अद्याप अरबांची राष्ट्रीय गाणी होतीं ! कधी अरब बुध्दिबळें खेळत. कधीं गप्पा मारीत बसत. व्यापा-यांचें जणूं छोटेंसें रिपब्लिकच होतें म्हणा ना. ज्या ज्या देशांशीं व्यापार चाले तेथील सुखभोग आले. परंतु अरब केवळ स्त्रैण व दुबळे नाहीं झाले. अद्याप पौरुष होतें. मर्दपणा होता.

मदिरेचें व मदिराक्षींचे मक्का माहेरघर झालें. जें धर्मांचें मुख्य स्थान तेंच विलासाचें. कारण धर्मामुळें तेथें पैसा येई. व्यापाराचाहि पैसा येई. पैशांपाठोपाठ व्यसनें येतातच. संगीतानें तर मक्कावाल्यांस वेड लावलें. मक्केंत एक गंवडी होता. तो गोड गाणारा होता. तो काम करीत असला म्हणजे तरुण त्याच्याभोवतीं येत व म्हणत ''गा रे गा'' ते त्याला पैसे देत. सुंदर खाद्यपेयें आणून देत. तो गवंडी म्हणे, ''आधीं मला माझ्या कामांत मदत करा. मग मी गाणें म्हणेन.'' आणि ते सारे तरुण कपडे काढून त्याला मदत करूं लागत! त्या गवंडयाच्याभोवतीं भराभरा दगड येऊन पडत. नंतर तो एका दगडावर उभा राही व गाऊं लागे. जवळच्या टेंकडीवर भराभरा लोक ऐकायला जमत. लाल, पिवळया पोषाखांनीं टेंकडी रंगे. मक्केंत गाणा-यांचा मोठा मान! गाणा-या कलावंतिणींना मोठमोठे खानदानी लोक प्रणाम करीत, आदरानें वागवीत. एखादी प्रसिध्द गाणारीण आली तर कोणी बडा अमीरउमराव तिचें स्वागत करी. त्या स्वागतांत सारें शहर सामील होई. मक्का सुखविलासांचे माहेर बनलें. या नागर जीवनात अरबांचे दुर्गुण प्रकट झाले. जुगार, मद्य, मदिराक्षी सा-या गोष्टी आल्या. वाळवंटांत बेदुइनांत द्यूत, दारू यांना जागा नव्हती. परंतु वीस-वीस हजार पौंड किंमतीचा माल आणणारे कारवान ज्या शहरांत वावरत तेथें या व्यसनांना जागा मिळाली. ग्रीक कन्यांच्या रागदारीनें डोलत, मदिरेनें मस्त होत, अरब-मक्केतील अरब-आपल्या फांसा फेंकी. द्यूत खेळूं लागे आणि सर्वस्व गमावून गुलाम बने!

« PreviousChapter ListNext »