Bookstruck

इस्लामी संस्कृति 41

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कसोटीचा काळ

क्षणभर हुरळलेले कुरेश आतां अधिकच चेकाळले. मुहंमदांची स्वत:च्या दैवी प्रेरणेवर श्रध्दा होती. हळूहळू त्यांची शिकवण रुजत होती. सत्याचें बीज आज ना उद्यां अंकुरल्याशिवाय कसें राहील ? वाळवंटांतील अरब व इतर व्यापारी मक्केच्या यात्रेस येत. पैगंबरांची वाणी ते ऐकत. पैगंबरांच्या आत्म्याचें निर्मळ व तेजस्वी असें प्रकटीकरण ऐकत. ती वाणी ऐकून ते थक्क होत. परत जातांना तो नव संदेश, तो नव प्रकाश घेऊन ते जात. नव जीवन घेऊन जात. शत्रूच्या उपहासानें, निंदाप्रचुर काव्यांनीं मुहंमदांची शिकवण अधिकच सर्वांना माहित झाली. ही वाढती कीर्ति, हा वाढता प्रसार कुरेश कसा सहन करतील. 'तुमच्या पुतण्याची ही वटवट बंद करा.' असें चुलते अबु तालिब यांचेकडे येऊन कुरेश सांगत. मुहंमदांचे मूर्तिपूजेवरील व खोटया धर्मांवरील हल्ले अधिकच तीव्र होऊं लागले. काबाच्या जागेंत ते प्रवचनें देत. तेथून त्यांना हांकलून देण्यांत आले. एके दिवशीं सारे कुरेश संतापून अबु तालिबांकडे आले व म्हणाले, 'तुमच्या पिकल्या केसांना आम्ही मान देतों. तुमचें स्थानहि उच्च आहे. परंतु आमच्याविषयीं असणा-या आदरालाहि कांहीं सीमा आहे. आमच्या देवदेवतांची निंदा तुमच्या पुतण्यानें सतत चालविली आहे. किती दिवस हें आम्ही सहन करावें ? आमच्या पूर्वजांचीहि तो नालस्ती करतो. ते मूर्ख होते असें म्हणतो. तुम्ही हें बंद करवा. नाहींतर उघड त्याची बाजू घ्या. म्हणजे तुमच्याशीहि मग आम्हांला लढतां येईल. परंतु सध्यांच्या तुमच्या दुटप्पी धोरणानें आम्हांला कांही करतां येत नाहीं. एक तर त्याचे व्हा, नाहींतर आमचे व्हा. मग लढाई करुं. कोणाचें तरी एकाचें निर्मूलन होईल.' असें म्हणून ते गेले. वृध्द अबु तालिबांच्या मनाची स्थिति केविलवाणी झाली होती. आपल्या लोकांपासून वियुक्त होणें हेंहि कठिण आणि निर्दोष पुतण्याला मूर्तिपूजकांच्या हातीं सोंपविणें हेंहि कठिण. काय करावें ? वृध्दानें मुहंमदांस बोलाविलें. मुहंमद नम्रपणें परंतु निश्चयानें बसले. चुलते म्हणाले, 'हें पहा मुहंमद, सोड हा नाद. तूं मलाहि वांच व स्वत:लाहि वांचव. बेटा, मला झेंपणार नाहीं इतका बोजा माझ्यावर नको घालूं.'

मुहंमद अभंग निश्चयानें म्हणालें, 'काका, माझ्या उजव्या हातावर सूर्य व डाव्या हातावर चंद्र ठेवून, मला स्वीकृत कार्यापासून ते परावृत्त करूं पाहतील तरीहि तें शक्य होणार नाहीं. मी मरेन, तेव्हांच माझें कार्य थांबेल !'

आपल्या चुलत्यांना सोडावें लागेल या विचारानें हे शब्द बोलल्यावर त्यांचें हृदय भरुन आलें. ते एकदम उठले. भावना लपवण्यासाठीं निघाले. परंतु वृध्द चुलत्यानें पुन्हां हांक मारली व ते म्हणाले, 'मुहंमद, शांत मनानें जा. ज्यांत तुझ्या आत्म्यास आनंद आहे तें सांगत जा. ईश्वराची शपथ मी तुला कधींहि सोडणार नाहीं, त्यांच्या हातांत देणार नाहीं.' आणि तदनंतर वृध्द अबु तालिब यांनीं बनी हाशिम व बनी मुत्तलिब या घराण्यांतील सर्वांना बोलावून सांगितलें, 'मुहंमदांची तुम्ही सारे बाजू घ्या. त्याच्या वतीनें उभे रहा.' सर्वांनीं ऐकलें व तदनुसार करण्याचें ठरविलें. फक्त अबु लहब विरुध्द बाजूला गेला. 'आगीचा बाप' असें त्याला इस्लामी इतिहासांत टोपण नांव मिळालें आहे.

चौथ्या वर्षी मुहंमद अल अरकमच्या घरी राहायला गेले. तें घर मध्यवर्ती होतें. यात्रेला येणारे जाणारे तेथें भेटत. या अल अरकमच्याच घरामागें एकदां कुराण ऐकत असतां मुसब इब्न उमायर हा मुस्लीम झाला होता. तो आपल्या आईच्या व जमातीचा लाडका होता. परंतु तो मुस्लीम झालेला पाहून तें प्रेम गेलें ! ते त्याचा छळ करुं लागले. तो अबिसिनियांत जाणा-यांपैकीं एक होता. अल अरकमच्या घरीं मुहंमदास मुसबची आठवण येई.

« PreviousChapter ListNext »