Bookstruck

इस्लामी संस्कृति 42

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परंतु याच वेळेस मुहंमदास एक मोठी जोड मिळाली ती म्हणजे उमरची. उमरचें नांव इस्लामी इतिहासांत अति विख्यात आहे. उमरचे वडील मुहंमदांच्या अनुयायांचे छळक म्हणून प्रसिध्द आहेत. स्वत: उमरहि मुहंमदांचे प्रथम कट्टे विरोधक होते.

त्याची बहीणहि मुहंमदांच्या धर्माची झाली होती. एके दिवशीं उमर हातांत नंगी समशेर घेऊन मुहंमदास ठार मारण्यासाठीं जात होता.

"कोठें जातोस उमर !' एकानें विचारलें.

"मी मुहंमदास शोधीत आहें. तो कुरेशांना मूर्ख म्हणतो. धर्माची निंदा करतो. आमच्या देवांची टिंगल करतो. ते अपकीर्तित करतो. आमच्यांत तो भांडणें लावीत आहे. भेद पाडीत आहे. त्याला ठार करतों.' उमर म्हणाला.

"तुझ्या घरांतल्यांचें आधीं शासन कर. त्यांना रस्त्यावर आण. त्यांना कर ठार.'
"माझ्या घरांत नवधर्मी कोण आहे !'

'तुझी बहीण फातिमा व तिचा नवदा सैद हे मुस्लीम झाले आहेत.'
हे ऐकून उमर एकदम बहिणीकडे जायला निघाला.
बहिणीच्या घरीं खब्बाब कुराण शिकवीत होता.

उमर हातांतल्या नंग्या समशेरीसह एकदम घरांत घुसला व म्हणाला, 'कसला आवाज मी ऐकला?'
'कांहीं नाहीं उमर.'

'नाहीं कसा ? कांहींतरी तुम्ही म्हणत होतात. तुम्ही मुहंमदांचे अनुयायी झाला आहांत नाहीं ?' असें म्हणून सैदवर त्यानें वार केला. फातिमा पतीला वांचवायला मध्यें पडली. तिलाही लागलें. ती म्हणाली, 'होय आम्ही मुस्लीम   झालों. नवधर्म घेतला. एक ईश्वर व त्याचा पैगंबर यावर आमचा विश्वास आहे. तुझी इच्छा असेल तर कर आम्हाला ठार.'

जखमी बहिणीच्या तोंडावरचें रक्त पाहून उमरचें हृदय द्रवलें. तो एकदम मृदु झाला. तो म्हणाला, 'तुम्ही जो कागद वाचीत होता तो मला द्या. मला पाहूं दे.' आणि बहिणीनें शेवटीं धीर करुन तो कागद भावाच्या हातीं दिला. कुराणाचा विसावा सुरा तो होता. उमरनें ती दैवी वाणी, संस्फूर्त वाणी वाचली. वाचल्यावर तो म्हणाला, 'खरेंच किती सुंदर, किती उदात्त ही वाणी !' पुन:पुन्हां त्यानें तो कागद वाचला. आणि म्हणाला, 'मलाहि घ्या तुमच्या धर्मांत. मुहंमदाकडे मला न्या. तुमचा धर्म मी स्वीकारला, असें त्यांना सांगू दें.

« PreviousChapter ListNext »