Bookstruck

जा, घना जा ! 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तुम्ही झोपा. जागरण झाले असेल. तुम्ही कोठून आलात?”

“मद्रासकडून.”

“प्रवासाचा खूप शीण झाला असेल. दुपारून सभा आहे. मी उठवीन.”

“ही संस्था सुंदरदासांनी स्थापली ना?”

“परंतु त्यांना प्रेरणा देणारे एक साधे सज्जन होते. त्यांचे माव रामजी मास्तर. रामजी मास्तर मोठे वेदान्ती होते. उत्कृष्ट सतार वाजवणारेही. सुंदरदासांना लहानपणी ते घरी शिकवायला जात. आणि सुंदरदासांना पुढे त्यांनी अध्यात्माची गोडी लावली. संस्कृतीचा, धर्माचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्हावा म्हणून ही संस्था काढायला त्यांनी सांगितले येथे पूर्वी विद्यार्थी घेतले जात. अलीकडे ती प्रथा कमी झाली आहे. आता एम्.ए. वगैरे झालेले फेलो म्हणून येथे घेतात. ते अभ्यास करतात. चर्चा करतात. सुंदरदासही चर्चेत भाग घ्यायला येतात. ते अध्यात्मवादी आहेत; परंतु त्यांचे अध्यात्म मला तितके रुचत नाही!”

“मी हिंदुस्थानभर भटकत येथे आलो. येथे तरी किती दिवस राहतो, हरी जाणे!”

“तुम्ही जरा पडा. मी जातो.”

घना निघून गेला. सखाराम पडून राहिला. तो विचारात होता. घनाबद्दल त्याला प्रेम वाटू लागले. याच्यासाठी का मी येथे आलो? आपल्या जीवनाच धागेदोरे कोठून कसे विणले जातात, काही कळत नाही; या विचारांत तो झोपी गेला.

तिस-या प्रहरी संस्थेच्या सभागृहात रामजी मास्तर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सभा होती. रामजी मास्तरांच्या तैलचित्राला हार घालण्यात आले. सुंदरदासशेठ आले होते. ते म्हणाले, “रामजी मास्तरांचा माझ्या जीवनावर कायमचा ठसा उठला आहे. जे काम हाती घ्यावे ते नीट पार पाडावे ही गोष्ट त्यांनी मला शिकवली. लहानपणी एक शब्द मला नीट लिहिता येईना. त्यांनी तो मला पंचवीस वेळा लिहायला लावला. परंतु त्यांचा सर्वात मोठा उपकार म्हणजे वेदान्ताची त्यांनी मला गोडी लावली. जगातील इतर सर्व तत्त्वज्ञानांपेक्षा वेदान्त श्रेष्ठ आहे, असे ते म्हणत. त्यांच्याच स्फूर्तीने ही संस्था स्थापण्यात आली. विवेकानंदांसारखे महात्मे या संस्थेने जगास द्यावे असे त्यांना वाटे. ते नि:स्पृह होते. मी एकदा त्यांना म्हटले आज वाटेल, ते माझ्याजवळ मागा. मी देतो. ते म्हणाले, दोन मुलगे आहेत; दहा एकर जमीन द्या. खपतील आणि खातील. परंतु ते अकिंचन वृत्तीचे होते. मरताना म्हणाले, देह सुटला. राम! जणू आत्म्याला चिकटलेले बंधन तुटले. या संस्थेत तुम्ही आहात. तुम्ही सर्व धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञाने यांचा अभ्यास करा. परंतु आपल्या संस्कृतीत ज्या अद्वैताचा सुगंध भरला आहे, ते अद्वैत तत्त्वज्ञान सर्वत्र न्या. त्याचा जयजयकार करा.”

« PreviousChapter ListNext »