Bookstruck

घनाचा आजार ! 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वैनीनेही मालतीला गोड गळ घातली. अखेरीस मालतीने शृंगारसाज केला. ती खरोखरच आज रमणीय दिसत होती. परंतु तिच्या लावण्यात करुणा होती,-खिन्न गंभीरता होती.

“आज कोण येणार आई?” जयंताने विचारले.

“आतेला बघायला येणार. नीट वाग. गडबड करून नकोस. पारवीला रडवू नकोस.”

छोटी पारवीही ‘आतेचे लग्न, आतेचे लग्न-’ म्हणत होती.

“माझ्या भावलीचे लग्नही मी लावीन. आई मला लाडू देईल. भावलीला दागिने देईल. गंमत जंमत.” असे म्हणत ती नाचत होती.

सखाराम त्या तरुणाला घेऊन आला. दादाने स्वागत केले, नमस्कार-चमत्कार झाले. हस्तमुखप्रक्षालनादी विधी झाले. मालतीने चहा आणला.

“अय्या!” जयंताने टाळी वाजवली.

“जयंता, आत जा बघू.” दादा रागाने म्हणाला.

“ही माझी बहीण.” सखाराम म्हणाला.

“वाटलेच. चहा तर उत्कृष्ट झाला आहे. अगदी साहेबी थाटाचा. बसा उभ्या का?” तो तरुण म्हणाला.

“मी जाते, काम आहे घरात.” म्हणून मालती आत गेली.

“फार विनयी बोवा तुमची बहीण.” तो म्हणाला.

“विनय हेच तर स्त्रियांचे भूषण.” दादा बोलला.

“ती जुनी संस्कृती. नवसंस्कृतीत विनय म्हणजे दूषण ठरते. अहो, पुढे पुढे केले पाहिजे. गप्पा मारल्या पाहिजेत. हसले पाहिजे. धीटपणा हवा.” तो तरुण प्रवचन देऊ लागला.

स्नाने वगैरे झाली. सखाराम, दादा, आत पाटपाणी करीत होते. जयंता-पारवी बाहेर डोकावत होती.

“ये बाळ.” तरुणाने हाक मारली. जयंता धीटपणे बाहेर गेला.

“तुझे नाव काय?”

“जयंता.”

« PreviousChapter ListNext »