Bookstruck

घनाचा आजार ! 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“छान आहे नाव.”

“तुम्ही आतेशी लग्न करणार?”

“तुला काय कळते बाळ?”

“मला सारे कळते. तुमचा हात पाहू?”

“तुला कोणी शिकवले?”

“मला येते. बघू दे हात.”

त्या तरुणाने हात पुढे केला. आणि गंभीर आव आणून तो पोरटा म्हणाला, “तुमचे लग्न होणार नाही. तुम्हांला दहा मुले होतील. आणखी काय बरे...”

“अरे, लग्न नाही मग मुले कशी होणार?”

“तुमच्या हातावर तसे आहे. मुले हात बघून असेच सांगतात!”

पारवीही बाहेर आली.

“आत्तेचे नोवरो काळे की गोरे?” ती म्हणत होती.

“मी आहे काळा!” तो तरुण म्हणाला.

“इश्श मेला काळा!” ती चिमुरडी म्हणाली.

“पारवी, जयंता,- तुम्हांला आत बसा, म्हटले ना? व्हा आत.” दादाने घसारा घातला.

“हुशार आहेत तुमची मुले.” पाहुणे म्हणाले.

जेवण सुरू झाले. फारसे बोलणे-चालणे होत नव्हते. परंतु तो विलायतेला जाऊ इच्छिणारा तरुण मालतीकडे बघे नि हसे. आणि मालती काही तरी वाढत होती. तो पुरे म्हणेना. ती आणखी वाढत होती.

“अहो पुरे. इतक्यातच आग्रह नका करू; पुढे करा. मी म्हटले, तुम्ही आपण होऊन वाढायच्या थांबाल!” तो छचोर तरुण म्हणाला.

मालती कोपायमान झाली. परंतु क्षणात मुखमंडळ शांत झाले.

जेवण झाले. मंडळी बाहेर बसली. पाहुण्यांना विडा देण्यात आला. विडा चघळीत व पेटवलेली सिगारेट फुंकीत तो तरुण आरामखुर्चीत पडून राहिला.

“तुम्ही जरा पडा. रात्रीचे जागरण असेल. पलीकडच्या खोलीत व्यवस्था आहे.” दादा म्हणाला.

« PreviousChapter ListNext »