Bookstruck

घनाचा आजार ! 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“दादांजवळ सांगेन.” असे म्हणू मालती उठून गेली.

“किती विनय हा?” तो तरुण उद्गारला.

“आपणाला विलायतेला जाण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?” दादाने विचारले.

“पाच हजार. आणखी जी रक्कम लागंल ती मी कर्ज काढीन. साराच भार तुमच्यावर नाही मी घालणार. मी विचार करून वागतो.”

“तुम्हांला दोन दिवसांनी कळवतो.”

“मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे.”

“विचारा.”

“तुमचे हे बंधू अविवाहितच आहेत. त्यांचेही लग्न आमच्या लग्नाबरोर व्हावे असे वाटते. माझी बहीण आहे. फारशी शिकलेली नाही, आणि एका डोळ्याने जरा अधू आहे. तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी, तसी मला माझ्या बहिणीची. मी तुमच्या बहिणीशी लग्न करतो; यांनी माझ्या बहिणीशी करावे. साधा सरळ व्यवहार!”

“मागून कळवू.” दादा म्हणाला.

पाहुणे जायला निघाले. मालती बाहेर आली नाही. सखाराम त्यांना पोचवायला गेला. गाडी गेल्यावर तो परत आला. दादा, सखाराम. मालता. सर्वांना त्याचा तिटकारा आला होता.

“सखाराम, काय ठरले?” आईने विचारले.

“बहुतेक ठरल्यासारखेच आहे.” तो म्हणाला.

“चांगले झाले. आता मी प्रत्यक्ष लग्नापर्यंत नाही जगले तरी हरकत नाही. एक चिंता मिटली. मला दोन दिवस मुळीच बरे वाटत नाही. जग सोडून जावे लागेल असे वाटते!”

“तू मालतीची काळजी नको करू. सारे सुरेख होईल. मी तुला वचन देऊन ठेवतो की तिचा संसार नीट मांडून दिल्याशिवाय मी कुठे जाणार नाही.” सखाराम म्हणाला.

« PreviousChapter ListNext »