Bookstruck

अपेक्षा 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दिवाणखाना भव्य होता. ठायी ठायी कोचे होती. मध्ये बैठक होती. तेथे होड होते. महात्माजींची तसबीर तेथे होती. घना तेथे बसला होता. तो व्यवस्थापक व मालक यांची वाट पाहात होता. खिशातून टकली काढून तो तेथे कातीत बसला आणि रामनाम म्हणत होता. त्याची क्षणात तन्मयता झाली.

“पुरे सारे ढोंग.” व्यवस्थापक येऊन म्हणाले.

“ढोंग आहे की मनापासून कर्म होत आहे, प्रभूला माहीत. तुम्ही तरी ढोंग करू नका म्हणजे झाले. येथे महात्माजींची तसबीर तुम्ही लावली आहे, तिला साक्ष ठेवून वागता ना?” घनाने विचारले.

“महात्माजी तर मालक म्हणजे ट्रस्टी म्हणतात. तुमचा निराळा प्रचार.”

“परंतु ट्रस्टी म्हणजे आपण काय समजता?”

“अज्ञानाचे पालक म्हणजे ट्रस्टी होणे. कामगारांना त्यांचे कल्याण कळत नाही. आम्ही त्यांचे हित पाहिले पाहिजे. आम्ही रोज कोर्टकचे-या करतो. ट्रस्टी म्हणजे काय ते का आम्हांला माहीत नाही?”

तुम्हांला खरेच माहीत नाही. महात्माजींच्या ट्रस्टीशिपचा हा अर्थ नव्हे. कामगारांनी मालकाला म्हणायचे, ‘आम्ही श्रमून संपत्ती निर्माण करून तुमच्या हवाली ठेवतो. ती सांभाळा, नीट व्याजी लावा, किंवा आणखी उत्पादनात घाला. आम्हांला गरज भासेल तेव्हा तुमच्याजवळ मागू. चाळी नसतील तर सांगू चाळी बांधा. पगार महागाईमुळे पुरत नसेल तर म्हणू पगार वाढवा; आणि हे सारे करण्याबाबत – आमच्या कष्टर्जित संपत्तीची व्यवस्था लावण्याबद्दल तुम्हांला महिना शे-दोनशे रुपये घ्या.’ महात्माजी तर एकदा म्हणाले, कामगार जर महिना पाचच रुपये ध्या म्हणतील तर मालकाने पाचच घ्यावेत. महात्माजींच्या ट्रस्टीशिपमध्ये असा हा क्रांतिकारक अर्थ आहे. आणि मालक आयत्या बिळावर नागोबा बनला तर कामगारांनी शांतपणे सत्याग्रह करावा असेही गांधीजींनी सांगितले आहो. आहे हा अर्थ पसंत? त्या महापुरुषाच्या लिहिण्यातला हा अर्थ आहे. आहे का पसंत? बोला. या अर्थाने ट्रस्टी व्हायला आहात का तयार? नसाल तर तुम्ही दांभिक ठराल. मग कशाला या तसबिरी? कशाला ही सोंगे?”

« PreviousChapter ListNext »