Bookstruck

अपेक्षा 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आम्ही गांधीजींच्या ट्रस्टीशिपचा अर्थ वकिलाला विचारू. मुनशींना विचारू.”

“विनोबाजींना विचारा. मश्रूवालांना विचारा.”

“त्यांना काय कायद्याची भाषा कळते?”

“परंतु सत्याची तर कळते ना?”

“सत्यावर दुनिया नाही जालत. चांदीचा रुपया बाजारात चालणार नाही. त्यात दुसरी धातू मिसळाल तेव्हाच तो खणकन वाजेल व बाजारात चालेल.”

“महात्माजींचे सत्य असे बाजारी नव्हते. ते शंभर नंबरी सोने होते.”

“जाऊ द्या त्या गोष्टी. आपण मुद्यावर येऊ. तुमचे म्हणणे काय? हल्ली सभा, मिरवणुका सारे चालले आहेत ते कशासाठी? ती मशालींची मिरवणूक कशासाठी? गावाला का आग लावायची आहे? तुम्ही जहाल बोलता, शिव्या देता. तुम्ही कृतघ्न आहात. ज्या मालकाने एवढ्या कामगारांना उद्योगाला लावले त्याला तुम्ही चोर म्हणता?”

“तुमची गीता त्याला जोर म्हणते; वेदातील ऋषी त्याला चोर म्हणतात. गीता सांगते, दुस-यांची झीज भरून न काढता चंगळ करीत बसणे म्हणजे चोर होणे. तुम्ही मोटारीसाठी तबेला सुंदर बांधता, परंतु कामगारांसाठी चाळी नाही बांधणार. इंजिन चालावे, यंत्र चालावे म्हणून तेल घालाल; परंतु हे जिवंत जीव जगावेत, त्यांच्या सांध्यांना तेल-तूप मिळावे म्हणून थोडी पगारवाढ करणार नाही. केवळ अधर्ममय आहात तुम्ही.”

“सुंदरदास आधार्मक? त्यांनी रामाचे मंदिर बांधले. लाखो रुपये देणग्या दिल्या ते अधार्मक?”
“जो पैसा निर्माण करून सुंदरदासांच्या हवाली करतो, त्याच्यासाठी काय केले, सांगा? इतर दानधर्माची यादी नका वाचू. कामगारांची पगारवाढ करणार आहात?”

“हल्लीचा पगार पुरेसा आहे. पगार अधिक केला तरी का पुरणार आहे? तो दारूत, सिनेमात, जुगारात जायचा.”

« PreviousChapter ListNext »