Bookstruck

इंदूरकडे प्रस्थान 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“सरकारचा पाहुणचार घेत आहेत.”

“त्यांना का अटक झाली?”

“हो.”

“संपाचे काय?” सखारामने विचारले.

“आजचा पहिला दिवस. काही थोडे आत गेले, परंतु तेही मागून बाहेर पडले. रात्री सभा आहे, तुमची भाषणे आहेत.” ब्रिजलाल म्हणाला.

इतक्यात गर्दीतून एक मुलगा पुढे येत होता. ‘अरे कोठे जातोस, कोण पाहिजे?’—त्याला विचारत होते, परंतु तो बोलत नव्हता.

तो आला नि सखारामच्या पाया पडला.

“कोण, रुपल्या? ऊठ, वेडा कुठला. असे पाया पडू नये. राष्ट्राने आता वाकू नये. खडे राहायला हवे. तू उंच झालास. गणा कसा आहे?” त्याने त्याला जवळ घेऊन विचारले.

“बरा आहे.”

सखाराम-मालती यांची मिरवणूक काढण्यात आली. तो निराळा अनुभव होता. जणू जबाबदारी शिरावर येऊन पडली होती. ठायी ठायी आरत्या ओवाळण्यात आल्या. कशाला हा सत्कार, आम्ही काय केले, असे उभयतांच्या मनात येई. परंतु ती घनाची तपश्चर्या होती. ती दोघे त्याची असल्यामुळे त्या तपश्चर्येचे फळ त्यांनाही मिळत होते.

घनाची खोली आली.

जयघोष झाले.

“जेऊन आता सभेला या. जा—”रामदास म्हणाला.

मंडळी पांगली. सखाराम व मालती यांनी स्नाने केली. जेवणे झाली.

थोडा वेळ मालती विसावा म्हणून पडली.

सखाराम सारी माहिती विचारीत होता.

« PreviousChapter ListNext »