Bookstruck

इंदूरकडे प्रस्थान 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मालतीने तो सुताचा हार हृदयाशी धरला होता. मनात म्हणाली, “त्यांनी मला हार घातला. मी त्यांना कधी घालू? उद्या भेटायला जाऊ तेव्हा घालीन. हाच हार त्यांना घालीन. दोघांसाठी एकच हार. दोघांची हृदये जोडणारा,--जीवने जोडणारा!”

तिकडे सभेची वेळ होत आली. गाणी, पोवाडे यांचा कार्यक्रम सुरू होता. सखाराम व मालती निघाली. बरोबर कामगार कार्यकर्ते होते. त्यांना बघून प्रचंड कडकडाट झाला.

तो म्हणाला :-- “हे सखाराम, सुंदरदासांच्या संस्कृतिमंदिरात होते. परंतु कामगारांच्या पगारातून तेथे पैसे घेतात असे कळताच ते तेथून निघून गेले. ते फकिरी वृत्तीचे आहेत. जनसेवेशी त्यांनी लग्न लावले आहे. देशभर हिंडून मोलाचे, अनुभवाचे ज्ञान त्यांनी मिळवले आहे. घनाभाऊंचे हे परम मित्र. आणि या मालतीताई. खूप शिकलेल्या आहेत. येथे कामगारभगिनींना धीर द्यायला त्या आल्या आहेत. सखाराम त्यांचा भाऊ. दोघांची भाषणे होतील ती ऐका.”

सखाराम उभा राहिला. तो म्हणाला, “बोलणे मला जमत नाही. काही सेवा सांगा, ती मी करीन. घनाची आज्ञा म्हणून मी आलो आहे. तुम्ही न्यायासाठी कष्ट, उपासमार भोगायला तयार आहात हे पाहून आनंद होतो. मी येथील संस्थेत होतो, तेव्हा तुमच्यात अशी जागृती नव्हती. घनाचे हे काम. त्याने संडास झाडले, रस्ते झाडले, साक्षरतेचे वर्ग चालवले. तुमची संघटना त्याने बाधली. आज तो अटकेत आहे. अन्यायी राजवटीत न्यायी माणसासाठी तुरुंग हीच जागा! घना तुरुंगात असला तरी तो तुमच्या हृदयात आहे. त्याच्या शिकवणीप्रमाणे आपण लढा चालवू. मी अधिक काय सांगणार?”

मालती उभी राहिली. प्रथम ती बावरली, घाबरली. चोहो बाजूंना माणसेच माणसे, परंतु एकाएकी तिला स्फूर्ती आली. ती म्हणाली, “बंधुभगिनींनो, मी एक सामान्य स्त्री. मी तुमची होईल ती सेवा करीन. तुमच्या चाळींतून हिंडेन. फाटके कपडे शिवून देईन. आजा-याला औषध देईन. तुमच्याबरोबर मी जगेन,-- तुमच्याबरोबर मरेन. तुम्ही संपावर आहात. तुम्हांला मदत लागेल. तुम्ही पाच हजारांचा फंड जमवाल. पार्वतीने हातातील अंगठी दिल्याचे ऐकले. मी गरीब आहे. परंतु हातांत या सोन्याच्या बांगड्या आहेत. त्या मी तुमच्या फंडाला देते. तन-मन-धन देऊन सेवा करावी असे म्हणतात. तुम्हांला यश मिळो!”

« PreviousChapter ListNext »