Bookstruck

इंदूरकडे प्रस्थान 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मॅजिस्ट्रेट म्हणाले, “ताबडतोब निकाल द्यायचे मी ठरवले आहे. मी आरोपीला निर्दोषी म्हणून सोडून देत आहे! (जयघोष होतात. लोकांना आश्चर्य वाटते!) गावात पुष्कळ कंड्या     उठल्या आहेत. मी पैसे खाल्ले आहेत वगैरे. काही माणसे पैरे देऊन मला विकत घ्यायला आली होती. परंतु मी माझा आत्मा मुक्त ठेवला. येथून बदली होता होता होतून काही वाईट घडू नये म्हणून मला इच्छा होती. पोलिसांनी केवळ भ्रष्ट होऊन हा खटला भरला आसावा, असे वाटते. त्यांनाही पैसे चोरले गेले होते की काय, कळत नाही. परंतु त्यांनी यापुढे तरी सत्याला धरून चालावे. आपणच असत्याने जाऊ लागलो तर कारभारच आटोपला. घनश्याम, तुमची व्याख्याने मी ऐकली आहेत. पुन:पुन्हा शांतीचा संदेश तुम्ही दिला आहे. खरा धर्म, खरी संस्कृती यांवरचे तुमचे विचार ऐकले आहेत. समाजाला त्यामुळे धोका येईल असे वाटत नाही. खोट्या धर्मावर कोरडे सर्वच संतांनी ओढले आहेत; धर्माची भांडणे भांडणारांना त्यांनी कुत्रे म्हटले आहे. असो. मी तुम्हांला निर्दोषी म्हणून सोडून देत आहे!”

“मी आपला आभारी आहे.” घना म्हणाला.

आणि घनाची मिरवणूक काढण्यात आली. अशी मिरवणूक सुंदरपुरात कधी निघली नव्हती. घनाला ठायी ठायी ओवाळण्यात येत होते. मिरवणुकीचे रूपान्तर शेवटी विराट सभेत झाले. मालतीने अभिनंदनपर सुंदर भाषण केले.

ती म्हणाली : “तुमचे भाग्य की तुमचा भाग्यविधाता तुमच्यात आला. कावळे राजहंसाला वेढू पाहात होते, -- परंतु कावळ्यांचा डाव उधड झाला. न्यायाधीशांनी न्यायाची प्रतिष्ठा सांभाळली. आता तुम्ही तुमच्या संकल्पाची प्रतिष्ठा सांभाळा. संप अखेरपावेतो चालवा. तुमच्या वतीने घनश्यामांना मी हार अर्पण करते.”

तिने त्याच्या गळ्यात फुलांचा घवघवीत हार घातला.

कामगारांचीही भाषणे झाली.

घनाने थोडक्यात उत्तर दिले. मोठ्या उत्साहात सभा संपली. संपाला जरा जोर चढला.

इंदूरहून अमरनाथची चिठ्ठी घेऊन बापू आला. घनाने ते पत्र वाचले. त्याचं तोंड फुलले. डोळे आशेने चमकले. मालती त्याच्या मुखचंद्राकडे पाहात होती.

« PreviousChapter ListNext »