Bookstruck

इंदूरकडे प्रस्थान 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“एकदम कसला आनंद झाला?” तिने विचारले.

“ध्येयाचा आनंद.” तो म्हणाला.

त्याने नवीन वसाहतीची योजना सखाराम व मालती यांना समजावून दिली. ते पत्र वाचून दाखवले.

“घना, खरोखरच आपण असे काही केले तर छान होईल. सर्व धर्मांचे लोक एकत्र सहकारी जीवन जगत आहेत. नवसंस्कृती फुलवत आहेत.” सखाराम म्हणाला.

“सखाराम, तू, मालती व काही कामगार तिकडे पुढे जाल? तेथे आरंभ कराल? संप अरेशी झाला तर येथील यूनियनचे काम दुस-यावर सोपवून मी मोकळा होईन व त्या नव-प्रयोगाला येऊन मिळेन. तुम्ही पुढे जा. पाया खणा. जमिनीचे निरीक्षण-परीक्षण करा. तेथे नदी आहे. तिचे पाणी कसे उपयोगिता येईल त्याचा विचार करा. खरेच, जा तुम्ही.”

“तुम्हांला सोडून?” मालतीने विचारले.

“माझा प्रयोग तुमच्या हातात म्हणजे माझा आत्मा तुमच्या हातात, असे नाही का? मी मनाने तुमच्याजवळ असेन. तेथे जाऊन भूमातेची सेवा सुरू करा.”

“म्हणजे काय होईल?”

“ती प्रसन्न होईल व आशीर्वाद देईल.”

“कोणता आशीर्वाद?”

“सुखी व्हा, -- असा आशीर्वाद.”

आणि खरोखरच एके दिवशी सखाराम, मालती, बाबू, बंड्या, बन्या, श्रीपती वगैरे लोक पुढे निघून गेले. पाहाणी करण्यासाठी म्हणून गेले. सखाराम, मालती, बाबू, ही तिघे तर तेथे पाय रोवण्यासाठी म्हणूनच गेली.

इकडे संप चालला होता, तिकडे नवा प्रयोग सुरू होत होता.

भारताच्या धडपडणा-या जीवांनो, चालू द्यात तुमचे सत्य-प्रयोग!

« PreviousChapter ListNext »